औरंगाबाद- 93 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले यांनी केली आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. जानेवारी 2020 मध्ये हे साहित्य संमेलन होणार आहे.
उस्मानाबादमध्ये रंगणार 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन औरंगाबादच्या मराठवाडा साहित्य परिषद कार्यालयात 93 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन घेण्याबाबत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध साहित्य मंडळाचे सर्वच सदस्य उपस्थित होते. जवळपास दीड तास चाललेल्या बैठकीत जानेवारी महिन्यात साहित्य संमेलन घेण्याबाबत एक निर्णय घेण्यात आला.
गेली 8 वर्षे उस्मानाबादला साहित्य संमेलनाची प्रतिक्षा होती. मात्र, कधी दुष्काळ तर कधी अजून काही यामुळे ते डावलले जात होते. मात्र, यावेळी 19 सदस्यांचे एकमत झाल्याने साहित्य संमेलन उस्मानाबादला रंगणार असल्याचे घोषित झाले. त्यामुळे उस्मानाबादला साहित्य संमेलनाचा मान मिळाल्यामुळे आनंद झाल्याचे कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले.
याबरोबरच नाशिकच्या साहित्य प्रेमींनीदेखील साहित्य संमेलन नाशिकमध्ये भरवण्याची मागणी केली होती. मात्र, सर्व सदस्यांनी यावेळी उस्मानाबादला साहित्य संमेलन घेण्याबाबत सहमती दर्शवली असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले यांनी सांगितले. जानेवारी 2020 मध्ये हे साहित्य संमेलन होणार असून तारीख अद्याप निश्चित झाली नाही.