औरंगाबाद- जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १८ जागेसाठी रविवारी (१८) जिल्ह्यातील दहा मतदान केंद्रावर ९३.९० टक्के मतदान झाले. १ हजार ११४ मतदरांपैकी १ हजार ४६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात फुलंब्री,सोयगाव आणि पैठण येथे शंभर ट्क्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक अधिकारी डॉ. मुकेश बारहाते यांनी दिली.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १८ जागेसाठी रविवारी (१८) जिल्ह्यातील मतदान झाले. या निवडणुकीत दिग्गजांनी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याध्ये मंत्री अब्दुल सत्तार, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अंबादास दानवे, नितीन पाटील, अभिजित देशमुख, जग्गनाथ काळे, एकनाथ जाधव, रविंद्र काळे, अनिल मानकापे, पवन डोंगरे, देवयानी डोणगावकर, कृष्णा डोणगावकर यांचा समावेश आहे.
सकाळी आठ वाजेपासून सर्वत्र मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. यात उमेदवार असलेल्यांनी आठ वाजेनंतर रांगेत उभे राहात मतदानाचा हक्क बजावला. सकाळी दहा वाजेपर्यंत ३२१ मतदारांनी हक्क बजावला होता. त्यानंतर बारा वाजेपर्यंत ७० टक्के मतदारांनी हक्क बाजवला. त्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत ९०.४ टक्के मतदान झाले होते.
कोरोनाबाधित मतदारांनी केले मतदान..
दुपारी साडे तीन वाजेपासून कोरोना बाधित मतदारांनीही मतदानाचा हक्क बजावला. पीपीई किट परिधान करून सर्व काळजी घेत हे मतदार रुग्णवाहिकेतून मतदान केंद्रस्थळी दाखल झाली होते. या मध्ये औरंगाबादच्या दोन्ही केंद्रावर ५ जणांचा मतदान केले. फुलंब्री, सिल्लोड आणि वैजापूर असे प्रत्येकी एक कोरोना बाधितांनी मतदान केले. सर्व मतदान केंद्रावर सुरळीत आणि वेळेत मतदान प्रक्रिया सुरु झाली. मतदारांनीही मास्क, सॅनिटायझरचा वापर यासह फिजिकल डिस्टन्स ठेवत मतदान केले.