औरंगाबाद- स्वयंपाक करत असताना विद्युत प्रवाहावर चालणाऱ्या शेगडीचा जोरदार झटका लागल्याने ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवार सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील चिंचाळा ( ता. पैठण ) येथे घडली आहे.
पैठण तालुक्यातील चिंचाळा येथील रहिवाशी मुक्ताबाई पंढरीनाथ बोडखे (७०) या आपल्याघरी बुधवारी सायंकाळी स्वयंपाक करत होत्या. त्या दरम्यान शेगडीला विद्युत पुरवठा करणाऱ्या वायरचा त्यांच्या हाताला स्पर्श झाला. वायरला स्पर्श होऊन विद्युत प्रवाहचा जोरदार झटका लागल्याने मुक्ताबाई यांचा तोल गेला व त्या शेगडीवर बेशुद्ध अवस्थेमध्ये पडल्या. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिला जेव्हा घरामध्ये गेल्या तेव्हा त्यांना मुक्ताबाई शेगडीवर पडल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी आरडाओरड करत या घटनेची माहिती मुक्ताबाई यांच्या नातेवाईकांना दिली.