महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Fraud in Aurangabad : भागीदारीचे आमिष देऊन ६ कोटी ७८ लाखाची फसवणूक, आरोपीला ठोकल्या बेड्या - औरंगाबादेत फसवणूक

अनिल राय हा सराईत भामटा असून त्याने बँक, स्टिल विक्रेते, स्क्रॅप विक्रेते यांची फसवणुक केल्याप्रकरणी त्याच्या विरुद्ध एमआयडीसी वाळुज व सिडको पोलिसात तीन गुन्हे, छत्तीसगड येथे दोन तर गुजरातच्या वडोदरा येथे दोन गुन्हे असे एकुण सहा गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याचे विरुध्द चेक बाऊन्सचे खटले न्यायालयात सुरू आहेत.

Fraud in Aurangabad
Fraud in Aurangabad

By

Published : Feb 20, 2022, 10:21 AM IST

औरंगाबाद - ऑर्बिट इलेक्ट्रोमेट इंडिया कंपनीत भागीदार करण्याचे अमिष दाखवुन कंपनीच्या एमडीने सोनालिका मेटल कॉर्पोरेशन कंपनीकडून वारंवार मालाची खरेदी केली. मात्र, त्याबदल्यात स्वतःच्या कंपनीत ५० टक्के भागीदारी देण्याचे अमिष दाखवून ६ कोटी ७८ लाखाची फसवणूक करून पसार झाला. याप्रकरणी २३ फेब्रुवारी २०२१ रोजी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वर्षभरानंतर आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी ऑर्बिट कंपनीच्या एमडीला छत्तीसगडच्या भिलाई येथून अटक केली. अनिल राजदयाल राय (४०, रा. वाळूज) असे अटकेतील भामट्याचे नाव आहे.

देवराम संताराम चौधरी (३६) यांची सोनालीका मेटल कार्पोरेशन नावाची वाळूज एमआयडीसीत कंपनी आहे. २०१७ मध्ये वाळूज एमआयडीसी भागातील ऑर्बिट इलेक्ट्रोमेट इंडिया प्रा.लि. कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर अनिल राय याने चौधरी यांच्या सोनालिका मेटल कॉर्पोरेशन कंपनीकडून वेळोवेळी स्टेनलेस स्टिल मालाची खरेदी केली. मात्र, राय याने खरेदी केलेल्या मालाचे पैसे न देता त्या मोबदल्यात चौधरी यांना ऑर्बिट कंपनीत ५० टक्के भागीदारी आणि कंपनीचे १ लाख २५ हजार शेअर्स देण्याची थाप मारली. तसेच डायरेक्टर पदाच्या नियुक्तीचे पत्र दिले. त्यानंतर अनिल राय याने चौधरी यांना डायरेक्टर पदाची प्रक्रिया ऑनलाईन असल्याने ती पूर्ण होण्यास दोन-तीन दिवसांचा वेळ लागेल. त्यामुळे तुम्हाला मुंबईहुन येथे प्रत्येकवेळी येणे शक्य होणार नाही. असे सांगुन ऑर्बिट इलेक्ट्रोमेक इंडिया प्रा.लि. कंपनीच्या दहा कोऱ्या लेटरपॅडवर व चेकवर चौधरी यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. त्यानंतर राय याने कोऱ्या लेटर पॅडवर केलेल्या स्वाक्षऱ्यांचा दुरुपयोग करुन चौधरी यांना ऑर्बिट कंपनीचे डायरेक्टर पदावरुन परस्पर काढुन टाकले. तसेच चौधरी यांचे नावे असलेले ३५ लाख रुपये किंमतीचे १ लाख २५ हजार शेअर्स परस्पर स्वतःचे नावे ट्रान्सफर करुन घेतले. राय याने चौधरी यांच्या स्टेनलेस स्टिल मालाचे ६ कोटी ४३ लाख रुपये व शेअर्सचे ३५ लाख असे एकुण ६ कोटी ७८ लाख रुपयांची फसवणुक करून फरार झाला होता.

छत्तीसगडच्या भिलाई कारागृहातून आणले -

वर्षभरापासून आर्थिक गुन्हे शाखा पोलीस रायच्या शोधात होती. तांत्रिक तपास करताना त्याच्या मोबाईल सिडीआरवरुन तो छत्तीसगडच्या भिलाई येथे असल्याचे दिसून आले. त्यावरून भिलाई पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला. तेव्हा राय हा दोन फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक असुन सध्या भिलाईच्या दुर्ग मध्यवर्ती कारागृहात असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन आर्थिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक तृप्ती तोटावार, पोलीस नाईक विठ्ठल मानकापे, संदीप जाधव, बाबासाहेब भानुसे यांनी राय याला ताब्यात घेवून औरंगाबाद येथे आणले.

राय सराईत भामटा, परराज्यातही अनेकांना गंडविले

अनिल राय हा सराईत भामटा असून त्याने बँक, स्टिल विक्रेते, स्क्रॅप विक्रेते यांची फसवणुक केल्याप्रकरणी त्याच्या विरुद्ध एमआयडीसी वाळुज व सिडको पोलिसात तीन गुन्हे, छत्तीसगड येथे दोन तर गुजरातच्या वडोदरा येथे दोन गुन्हे असे एकुण सहा गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याचे विरुध्द चेक बाऊन्सचे खटले न्यायालयात सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details