औरंगाबादेतील 6 जण कोरोनामुक्त, तर 2 नवे रुग्ण आढळल्याने संकट कायम
शुक्रवारी दुपारी एकाचवेळी सहा रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उपचार घेऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या आता 22 वर गेली आहे. तर दोन रुग्णांची वाढ झाली आहे.
औरंगाबाद- शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. शुक्रवारी दुपारी एकाचवेळी सहा रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उपचार घेऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या आता 22 वर गेली आहे. तर दोन रुग्णांची वाढ झाली आहे.
औरंगाबादेत कोरोनाची रुग्णसंख्या 42 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 22 रुग्ण उपचारानंतर पूर्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आता 15 रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये 13 जिल्हा रुग्णालयात तर 2 जण घाटी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी यांनी दिली.
आज कोरोनामुक्त झालेल्या सहा जणांमध्ये देवळाई येथील एकाच कुटुंबातील दोन महिलांचा, यादवनगर येथील 29 वर्षीय तरुण, किराडपुरा येथील 11 वर्षीय मुलगी आणि 33 वर्षीय महिलेचा तर जलाल कॉलनीतील 17 वर्षीय मुलाचा समावेश आहे. उपचारानंतर या सर्वांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले. या सर्वांना घरी निरोप देत असताना जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी फुल देऊन त्यांचे अभिनंदन केले. उपचार पूर्ण झालेल्या या सहा रुग्णांनी डॉक्टरांचे आभार मानले. आतापर्यंत 22 रुग्ण उपचार घेऊन घरी गेल्याने ही चांगली बाब असल्याचे मत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. तर आज पुन्हा दोन नवीन रुग्ण वाढले आहेत. भीमनगर भावसिंगपुरा येथील एक तर असेफिया कॉलनीतील एक असे दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे सहा जण कोरोनामुक्त झाले असले, तरी दोन रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे अद्याप कोरोनाचे संकट कायम असल्याचे चित्र आहे.