औरंगाबाद -बांधकाम मिस्त्रीने तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत त्या तरुणीवर बलात्कार करुन तिला गर्भवती केल्याची घटना मंगळवारी समोर आली. क्रांती चौक पोलिसांनी गुन्हा दाखल होताच अवघ्या एक तासात आरोपीला अटक केली. अक्रम अय्युब पठाण ( वय 29, रा. कासंबरी दर्गा, गट नं. 92, पडेगाव) असे आरोपीचे नाव असून त्याला 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. यु. न्याहारकर यांनी बुधवारी दिले.
पोलीस ठाण्यात 25 वर्षीय तरुणीने दिलेली तक्रार अशी, की आरोपी अक्रम पठाण हा पीडितेच्या काकाच्या घराचे बांधकाम करत होता. तिथे दोघांची ओळख झाली. फेब्रुवारी महिन्यात पीडिता ही काकाच्या घराजवळ बसलेली असताना आरोपीने तिचे तोंड दाबून तिला घराच्या वरच्या मजल्यावर नेले व तिथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तसेच कोणाला काही सांगितल्यास जीवे मारुन टाकीन, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपीने तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला.
काही दिवसांनी पीडितेला चक्कर आल्याने तिला तिच्या आई व नातेवाईकांनी दवाखान्यात नेले. तिथे डॉक्टरांनी तिला सात महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. या घटनेनंतर पीडितेने आई व नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच, क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या तासाभरात आरोपीला अटक केली. बुधवारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.