औरंगाबाद(पैठण) - एका 24 वर्षीय विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. पैठण तालुक्यातील रांजणगाव दांडगा येथे बुधवारी (3 फेब्रुवारी) दुपारी एक वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. सायंकाळी सहा वाजता हा प्रकार उघडकीस आला. आयेशा शेख (वय २४), आलीया शेख (३ वर्ष), तंजीला शेख (चार महिने), अशी मृतांची नावे आहेत.
घरगुती वादातून आत्महत्या केल्याची शक्यता -
पैठण तालुक्यातील तुळजापूर येथील आयेशा शेख यांचा विवाह पैठण तालुक्यातील रांजणगाव दांडगा येथील इरफान शेख यांच्या बरोबर पाच वर्षांपूर्वी झाला होता. हे दोघेही कुटुंबातून विभक्त राहत होते. त्यांना तंजीला व आलिया अशी दोन अपत्ये होती. मंगळवारी रात्री इरफान व आयेशा शेख या दोघांमध्ये किरकोळ वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. याच कारणाने बुधवारी आयेशाने घरात कुणी नसल्याचे पाहून रांजणगाव दांडगा शिवारातील विहिरीवर जाऊन आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.