औरंगाबाद -झेंडा फिरवण्याच्या कारणावरुन शिवजयंतीच्या मिरवणुकीत २१ वर्षीय तरुणाची भोसकून हत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, जोपर्यंत दुसरा आरोपी अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे. या घटनेनंतर पुंडलीकनगर भागातील बाजारपेठेतील दुकाने तरुणांनी बंद केली होती.
बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास श्रीकांत गोपीचंद शिंदे या 21 वर्षीय तरुणाची झेंडा दिला नाही या रागातून राहुल सिद्धेश्वर भोसले व विजय शिवाजी वैध या दोघांनी धारदार तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केली. या हत्येनंतर पसार झालेला आरोपी विजय वैधला पुंडलीकनगर पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. मात्र, या घटनेतील प्रमुख आरोपी राहुल भोसले हा अद्याप फरार आहे. आरोपी पकडण्यात आल्याची माहिती मिळताच मृताच्या नातेवाईक मित्र परिवाराने पुंडलीकनगर पोलीस ठण्यासमोर गर्दी केली होती. सुमारे दीडशे ते दोनशे नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे काही काळ पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण होते.