महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ट्रकच्या धडकेत जिवलग मित्रांचा मृत्यू, नक्षत्रवाडीजवळ झाला अपघात - truck accident aurangabad

ट्रकच्या धडकेत दोन जिवलग मित्रांचा मृत्यू झाला आहे. एकनाथ खैरे आणि नवनाथ शेजूळ अशी मृतांची नावे आहेत.

died friends
मृत दोन्ही मित्र

By

Published : Sep 26, 2020, 1:59 AM IST

औरंगाबाद - बिडकीनहून दुचाकीने औरंगाबाद शहरात येणाऱ्या दोन जिवलग मित्रांना नक्षत्रवाडीजवळ पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने चिरडले. यात त्यांचा मृत्यू झाला. एकनाथ किसन खैरे (वय ३०) आणि नवनाथ तुकाराम शेजूळ (वय ४०, दोघेही रा. तोंडूळी, ता. पैठण) अशी दोन्ही मृतांची नावे आहेत. अपघातानंतर घटनास्थळावरुन धुम ठोकलेल्या ट्रक चालकाला संताजी पोलीस चौकीजवळ वाहतूक पोलिसांनी पकडले. ही घटना शुक्रवारी घडली.

दोघेही चार ते पाच दिवसांपुर्वी कंत्राटदारामार्फत बजाज कंपनीत नोकरीला लागलेले होते. नवनाथ शेजूळ पुर्वी क्रेशरवर काम करायचे. त्यांनी तोंडूळी गावात शेतीसुध्दा आहे. नवनाथ शेजूळ हे नेहमी कामानिमित्त औरंगाबादला दुचाकीवर यायचे. शुक्रवारी सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास मित्र एकनाथ खैरे यांनासोबत घेऊन शहरात येत होते. नक्षत्रवाडीच्या मुख्य रस्त्यावरुन दोघेही दुचाकीने (एमएच-२०-एफजे-६६७७) शहराकडे येत होते. त्याचवेळी पाठीमागून भरधाव आलेल्या मालवाहू ट्रक (यूपी-६३-ई-५६३६) चालकाने दुचाकीला धडक दिली.

अपघात इतका भयंकर होता की, दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एकनाथ यांच्या डोक्यावरुन ट्रकचे पाठीमागील चाक गेले. तर नवनाथ यांच्या कंबर आणि गुप्तांगाला जबर मार लागला. त्यामुळे एकनाथ यांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघात घडल्यावर नवनाथ यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेत असताना त्यांची रस्त्यातच प्राणज्योत मालवली.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. दिनेश कोल्हे, सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे, वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद देशमुख आदींनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. या अपघात प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details