औरंगाबाद- घरात खेळताना गळ्याभोवती ओढणीचा फास बसल्याने १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शहरातील उस्मानपुरा भागात गुरुवारी रात्री घडली. आरमान अजीज कुरेशी असे मृत मुलाचे नाव आहे.
घरात खेळताना गळ्याभोवती ओढणीचा फास बसल्याने १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू - फास
उस्मानपुरा भागात घरात खेळताना गळ्याभोवती ओढणीचा फास बसल्याने १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
![घरात खेळताना गळ्याभोवती ओढणीचा फास बसल्याने १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3305974-thumbnail-3x2-chi.jpg)
गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास आरमान हा घरात ओढणीच्या साहाय्याने खेळत होता. त्यावेळी अचानक त्याच्या गळ्याभोवती ओढणी गुंडाळली गेली. त्यामुळे त्याला गळफास बसला. घरातील सदस्यांपैकी कुणाला काही समजण्याच्या आतच तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला.
हा प्रकार लक्षात येताच नातेवाईकांनी त्यास शासकीय घाटी रुग्णालयात हलविले. तेथे उपचार सुरू असताना काही तासातच मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनके करीत आहेत.