औरंगाबाद - सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील काटोन वस्ती शिवारातील शेततळ्यात आज दुपारी बाराच्या सुमारास दहावीत शिक्षण घेणारा विद्यार्थी भागवत कारभारी दांगोडे (वय.१६) याचा बुडून मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंधारी येथील विद्यार्थी भागवत कारभारी दांगोडे हा दुपारी शाळेच्या सुट्टीनंतर काटोनवस्ती शिवारात गेला. या शिवारातील शेख फारुख यांच्या शेतातील शेततळ्यावर घोड्याला पाणी पाजण्यासाठी गेला असता पाय घसरल्यामुळे तो या शेततळ्यात बुडाला. थोड्या वेळानंतर वडील कारभारी दांगोडे हे अजून मुलगा का आला नाहीत हे पाहण्यासाठी गेले असता त्यांना मुलगा शेततळ्यास बुडाल्याचे कळाले. त्यांनी आरडा ओरड करून परिसरातील शेतकऱ्यांना बोलावले. ही घटना वाऱयासारखी गावभर पसरल्याने गावातील श्याम सोनवणे,शाहरुख शेख कलीम,योगेश जाधव,ज्ञानेश्वर वाघ या तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन शेततळ्यात उड्या मारून मोठे शर्तीचे प्रयत्न करून भागवतची शोधा शोध केली.परंतु शेततळ्यात जास्त प्रमाणात पाणी असल्यामुळे जवळपास तासभरानंतर भागवतला शेततळ्याच्या बाहेर काढण्यात यश आले. परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.