औरंगाबाद - सिल्लोड तालुक्यात दुचाकी व बोलेरो जीपचा अपघात झाल्याची घटना गडली. यामध्ये दुचाकीवरील १ जण जागीच ठार झाला असून, २ जण गंभीर जखमी झाले आहेत. मयूर विष्णू सोनवणे (१६) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास जळगाव हायवेवरील सिल्लोड माणिकनगरच्या वळणावर हा अपघात घडला.
हेही वाचा - 'शिवसेना हिंदुत्व आणि भगवा मरेपर्यंत सोडणार नाही'
हेही वाचा - 'जास्त नाटकं कराल तर दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल'
दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आळंद येथून बजाज प्लॅटीना मोटारसायकलवर (क्रमांक एम एच २० एफ बी १७९९) अल्पवयीन चालक येत होता. माणिकनगरच्या वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्यामुळे दुचाकीस्वार समोरून येणाऱ्या महिंद्रा बोलेरो जीपवर (क्रमांक एम एच २१ बि एच २५१३) जाऊन धडकला. अपघात इतका जबरदस्त होता की दुचाकीवरील मयूर विष्णू सोनवणे (वय १६, रा. खामगाव गोरक्षनाथ ता. फुलंब्री जिल्हा औरंगाबाद) हा जागीच ठार झाला. तर त्यासोबत असलेल्या आकाश साईनाथ सोनवणे (वय १६, रा. खामगाव जिल्हा औरंगाबाद गोरक्षनाथ) आणि ऋषिकेश नारायण सुलताने (वय १६, रा. आळंद जिल्हा औरंगाबाद) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे. याबाबत सिल्लोड ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.