सातारा - बीड बायपास रस्त्यावर २ दिवसात झालेल्या दुसऱया अपघातात पुन्हा एका महिलेचा बळी गेला आहे. बायपास रस्त्यावर रविवारी दुपारी २च्या सुमारास झालेल्या अपघातात वत्सलाबाई मच्छिंद्र काळे (५०, नाईकनगर, देवळाई परिसर) यांचा मृत्यू झाला. मृत वत्सलाबाई मुळच्या ताडपिंपळगाव (ता. कन्नड) येथील रहिवासी होत्या.
देवळाई परिसरातील नाईकनगरात राहणाऱया वत्सलाबाई काळे पती मच्छिंद्र काळे यांच्यासोबत दुचाकीवर बसून कन्नड तालुक्यातील ताडपिंपळगावकडे निघाल्या होत्या. यावेळी सूर्या लॉन्समध्ये लग्न समारंभ असल्याने मोठी गर्दी होती. याचवेळी बीडकडून येत असलेला भरधाव ट्रक त्यातून मार्ग काढत होता. तेव्हाच दुचाकीस्वार मच्छिंद्र काळे यांच्या दुचाकीला ट्रक चालकाने पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या वत्सलाबाई रस्त्यावर पडून ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडल्या. यात मच्छिंद्र काळे हे किरकोळ जखमी झाले.
पोटावरुन चाक गेल्याने वत्सलाबाई यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पाहताच सूर्या लॉन्समधील वऱ्हाडींनी ट्रक चालकाच्या दिशेने धाव घेतली. त्याला पकडलेले असतानाच सातारा पोलीस ठाण्याचे जमादार ए. ए. मरकड, ए. ए. शेख आदिंनी घटनास्थळी धाव घेत ट्रक चालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर वत्सलाबाईंचा मृतदेह पोलीस व्हॅनने घाटीत हलवण्यात आला. या अपघाताची माहिती मच्छिंद्र काळे यांनीच पोलिसांना दिली.
दोन दिवसात दुसरा बळी
बीड बायपास रस्त्यावरील एमआयटी महाविद्यालयाच्या चौकात ८ मार्चला दुपारी स्नेहल मनोज बावळे यांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला होता. बीड बायपास रस्त्यावर ट्रकसारखी मोठी वाहने सुसाट वेगाने धावताना दिसतात. या मार्गावर मध्यंतरी ट्रकसह इतर वाहनांवर वेग मर्यादा घालण्यासाठी स्पीड गन वापरण्यात आली होती. मात्र, स्पीड गन नादुरुस्त असल्याने या रस्त्यावरील वाहतुकीवर नियंत्रण राहिलेले नाही. वर्षभरात याच रस्त्यावर आतापर्यंत ८ ते १० जणांचा बळी गेला आहे.