युवा स्वाभिमान पक्षाकडून मुख्यमंत्र्यांचा निषेध; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - अमरावती युवा स्वाभिमान पक्ष आंदोलन
विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दोघेही एक-दोन दिवसात राज्यपालांची भेट घेणार असून विदर्भातील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाला सांगावे, अशी विनंती करणार आहेत.
अमरावती
अमरावती- जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात शेतकरी संकटात असल्याने त्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळावी. तसेच मुख्यमंत्र्यांनी विदर्भ दौरा करावा, या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पराटी जाळून लक्षवेधी आंदोलन केले.
1) ऐन दिवाळीत अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळावी.
2) मुख्यमंत्र्यांनी विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करावा. शेतकऱ्यांच्या बांधावर पोचून त्यांचे मानसिक बळ वाढवावे.
3) अवास्तव आलेले वीज देयकातील निम्मी रक्कम माफ करावी.
राणा दाम्पत्य घेणार राज्यपालांची भेट
विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दोघेही एक-दोन दिवसात राज्यपालांची भेट घेणार असून विदर्भातील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाला सांगावे, अशी विनंती करणार आहेत. ही माहिती आंदोलनाचे प्रमुख युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी खडसावले
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी निवेदन सादर करण्यासाठी माझा दालनात केवळ तीन जण या, असे सांगितले असताना युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशस्त दालन व्यापल्याने जिल्हाधिकारी संतापले. मी तिघांना परवानगी दिली. इतकी गर्दी का केली? अशा शब्दात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्हाध्यक्ष जितू दुधाने यांना खडसावले. दालनातील गर्दी कमी झाल्यावरच त्यांनी निवेदन स्वीकारले.