अमरावती- राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही अमरावती जिल्ह्यात अवैधरीत्या गुटखा हा पान टपरीवर विकला जातो. मात्र, अन्न व औषध प्रशासन यावर कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप करत शुक्रवारी (दि. 31 डिसेंबर) अमरावती जिल्हा युवक काँग्रेसने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना गुटखा देत आंदोलन केले.
अधिकाऱ्याला गुटखा देत युवक काँग्रेसचे आंदोलन - अन्न व औषध प्रशासन
अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्याला गुटखा भेट देत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले.
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी अमरावती जिल्हात सुरू असलेली अवैध गुटखा विक्री थांबवून गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करावी, असे आदेश प्रशासनाला दिले होते. परंतु, त्यानंतरही गुटखा विक्री सुरूच असल्याने संतप्त झालेल्या अमरावती जिल्हा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना थेट गुटखा भेट देऊन अवैधरीत्या सुरू असलेली गुटखा विक्री तत्काळ बंद करण्याची मागणी केली. गुटखा बंदी झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.
हेही वाचा - बच्चू कडुंची 'राहुटी'... विविध शासकीय कागदपत्रांची कामे एकाच मंडपात