महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कचरा वेचणाऱ्या हातात पेन देण्याचे 'मिरॅकल'; अमरावतीतील ध्येयवेड्या तरुणाच्या धडपडीची कहाणी - shool

गरज आहे या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्याची. समाजातील सक्षम व्यक्तींनी पुढे येऊन आर्थिक मदतीसहीत इतर मदतही करावी असे आवाहन करण्यात येत आहे. असे करणे आवश्यक आहे. या चिमुकल्यांच्या डोळ्यातील स्वप्न आणि महत्वकांक्षेचे संवर्धन करणे आवश्यक आहे. न जाणो उद्या याच वस्तीतून देशाचे नेतृत्व निर्माण होईल.

विद्यार्थ्यांसाठीची शाळा

By

Published : Nov 20, 2019, 6:11 AM IST

Updated : Nov 21, 2019, 12:13 AM IST

अमरावती - ज्या हातात कचरा वेचण्यासाठीचे पोतडे होते, त्याच हातात आज वही पेन आहे. ज्या डोळ्यांसमोर काही दिवसांपूर्वी कचऱ्याचा ढीग होता, तेच डोळे आज काहीतरी होण्याचे स्वप्न पाहत आहेत. ही एखादी कहाणी नव्हे तर, अमरावतीतील नवसारी भागातल्या पारधी वस्तीवरील वस्तुस्थिती आहे. एका ध्येववेड्या तरुणाने येथील गरीब मुलांना शिकवण्याचा विडा उचलला आहे. त्यासंबंधीचा ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट

अमरावतीच्या नवसारी भागातील मिरॅकल फाऊंडेशनीच शाळा

अमरावतीतील नवसारी भागात ३०० घरांची पारधी समाजाची वस्ती आहे. आठराविश्वे दारिद्र्य या वस्तीत कायम वसतीला आहे. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत. जिथे रोज अंघोळ करणे हीच एक चैन आहे. तिथे शिक्षण म्हणजे चंद्रावर जाण्याइतकी अशक्यप्राय गोष्ट. या वस्तीतील लहानग्यांपर्यंत शिक्षणाची गंगा नेण्याचा संकल्प एका भगिरथाने केला. या आधुनिक भगिरथाचे नाव आहे पियुष वानखडे.

लहानग्यांच्या जीवनात 'मिरॅकल'

पियुष वानखडे हा एक उच्चशिक्षीत तरुण आहे. रोज सकाळी फिरण्यासाठी तो शहरातून नवसारी परिसरात येत असे. तेव्हा इथली लहान मुले त्याला भटकताना दिसायची. कचरा वेचणे, भीक मागून खाणे अशी कामे ही मुले करायची. या मुलांना बघून पियुषच्या मनात विचार आला, की या मुलांनाही शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळायला हवा. त्याच्या याच विचारातून मिरॅकल हार्ट फाऊंडेशन या संस्थेचा पाया रचला गेला.

उघड्यावरच भरते शाळा

मिरॅकल हार्ट फाऊंडेशनच्या माध्यमातून पियुषने जेव्हा दीड वर्षांपूर्वी इथे शाळा सुरू केली, तेव्हा त्या शाळेत फक्त पाच विद्यार्थी होते. पण, हळुहळु मुलांचा आणि त्याच्या पालकांचा विश्वास संपादन करण्यात त्याला यश आले. आणि आज या शाळेत जवळपास ७० विद्यार्थी शिक्षण घेतात. पण, या विद्यार्थ्यांसाठी आजही पक्क्या शाळेची सोय नाही. उघड्यावरच एक पत्र्याचे शेड टाकून ही शाळा भरते. या शाळेत हे विद्यार्थी मूळाक्षरे गिरवत आहेत.

जेवणाची भ्रांत तुर्तास मिटली

पियुष वानखडेची ही धडपड पाहून आणखी काही लोक त्याच्यासोबत जोडले गेले. काही जणांनी आर्थिक मदत देऊ केली. त्यातूनच या मुलांसाठी दररोजच्या आहाराची सोय करण्यात आली. आता येथे दररोज खिचडीचा आस्वाद विद्यार्थी घेत आहेत. या शाळेत येऊन मुले आकडेमोड शिकत आहेत. अक्षर ओळख करुन घेत आहेत. त्यासोबतच त्यांच्या खाण्याचा प्रश्न मिटला आहे. त्यामुळे त्यांना भीक मागत फिरण्याची गरज नाही. या कारणाने त्यांचे पालक सुद्धा समाधान व्यक्त करत आहेत.

देणाऱ्या हातांची गरज

पियुष वानखडेचा हा प्रयत्न आज प्राथमिक स्थितीत आहे. ७० विद्यार्थी शिकणारी ही शाळा आज उघड्यावरच आहे. तिला एका पक्क्या इमारतीची गरज आहे. वस्तीवरुन शाळेपर्यंत येण्यासाठी एखादी स्कूल व्हॅन असावी, अशी इच्छाही विद्यार्थी बोलून दाखवत आहेत. आता गरज आहे या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्याची. समाजातील सक्षम व्यक्तींनी पुढे येऊन आर्थिक मदतीसहीत इतर मदतही करावी असे आवाहन करण्यात येत आहे. असे करणे आवश्यक आहे. या चिमुकल्यांच्या डोळ्यातील स्वप्न आणि महत्वकांक्षेचे संवर्धन करणे आवश्यक आहे. न जाणो उद्या याच वस्तीतून देशाचे नेतृत्व निर्माण होईल.

Last Updated : Nov 21, 2019, 12:13 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details