अमरावती -पावसाळ्यापूर्वी खड्डे दुरुस्तीसह जिल्ह्यातील आवश्यक रस्ते, पूल व इमारतींची कामे प्राधान्यक्रम लक्षात घेऊन तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. वनविभागाच्या परवानगीसह इतर कुठल्याही अडचणी आल्यास तत्काळ कळवावे. सरकारकडे आपण स्वत: पाठपुरावा करू. मात्र, जिल्ह्याच्या रस्ते विकासात अडथळा येता कामा नये , असे सुस्पष्ट निर्देशही त्यांनी दिले.
जिल्ह्यातील रस्ते विकासाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, आमदार प्रताप अडसड, आमदार राजकुमार पटेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरूंधती शर्मा यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील हायब्रीड ॲन्युईटीअंतर्गत व इतर विविध योजनांतील रस्त्यांचा समग्र आढावा यावेळी पालकमंत्र्यांनी घेतला. रस्ते विकासासाठी वनविभागाची परवानगी किंवा इतर कुठलीही अडचण आल्यास तत्काळ निदर्शनास आणून दिली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. विभागांनी माहितीचे परिपूर्ण सादरीकरण वेळोवेळी केले पाहिजे. आपण स्वत: मुख्यमंत्री व वन मंत्र्यांकडे पाठपुरावा करू. मात्र, जिल्ह्यातील रस्तेविकास थांबता कामा नये.
लॉकडाऊनमध्ये विकासकामांची गती काहीशी मंदावली असली तरीही पावसाळा लक्षात घेता प्राधान्यक्रम लक्षात घेऊन आवश्यक कामे तत्काळ पूर्ण करावीत. मेळघाटात अनेक कामे प्रलंबित आहेत. तेथील पूल, रस्ते दुरुस्ती तत्काळ करून घ्यावी. दुर्गम भागातील गावांचा संपर्क तुटता कामा नये. पावसाळ्यात खड्ड्यांमुळे अपघात संभवतात. तसे घडता कामा नये. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे दुरुस्ती तत्काळ करून घ्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.