अमरावती-महिला व बालविकास मंत्री अॅड.यशोमती ठाकूर यांनी राज्यातील माता-भगिनींना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळातही बालके व महिलांच्या पोषणावर विपरीत परिणाम झाला नाही हे अंगणवाडी सेविकांचे यश आहे, असे त्यांनी म्हटले आहे. ठाकूर यांनी अंगणवाडी सेविकांच्या कामाला सलाम करणारी कविचा रचली आहे.
राज्यातील माता-भगिनींना अॅड. यशोमती ठाकूर यांच्याकडून मातृदिनाच्या शुभेच्छा - अंगणवाडी सेविकांना मदर्स डे समर्पित
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांच्याकडून राज्यातील माता-भगिनींना मातृदिनाच्या शुभेच्छा यावर्षीचा मातृदिन अगंणवाडी सेविकांना समर्पित केला आहे त्यासाठी एक अभंगपर कविता रचली आहे.
कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये महिला व बालविकास विभाग लहान बालके, गर्भवती, स्तनदा माता यांच्या पोषण आहाराची तसेच आरोग्याची काळजी घेण्यासाठी अहोरात्र काम करत आहे. राज्यातील 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील सुमारे 57 लाख 10 हजार बालके आणि 11 लाख 26 हजार गर्भवती, स्तनदा माता आणि किशोरी योजनेतील किशोरवयीन मुलींपर्यंत पूरक पोषण आहार (टेक होम रेशन) घरपोच वितरीत करण्यात आला आहे.
लॉकडाऊनच्या काळातही बालके व महिलांच्या पोषणावर विपरीत परिणाम झाला नाही. हे अंगणवाडी सेविकांच्या मेहनतीचे यश आहे. हे सर्व काम आरोग्यविषयक आवश्यक ती दक्षता घेत तसेच योग्य सुरक्षित अंतर (फिजिकल डिस्टंसिंग) राखत केले जात आहे.महिला व बालविकास विभाग राज्यातील बालके आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपत्ती कालावधीतदेखील उत्कृष्टरित्या काम करत आहे, असे मत पालकमंत्री ठाकूर यांनी व्यक्त केले.
ॲड.यशोमती ठाकूर यांनी केलेली कविता –
माझ्या अंगणवाडी सेविकांनो, कामे करता तूम्ही।
त्याने प्रसन्न होई माय, प्रसन्न होई मायभूमी।।
माय सांगे लेकरा, नका जाऊ बाहेरा।
ऐका आईचे ज़रा, ठेवा करोना दूरा ।।
मातेचा मायेचा हात, प्रेमाचा मोठा स्त्रोत।
वारंवार धूवा हात, करू कोरोनावरी मात।।
आई धरे पोरा अंतरी, उभे रहा योग्य अंतरी।
संदेश हा यशोमतीचा, महिला बाल कल्याणाचा।।
करुया माय वंदना, करुया दूर कोरोना।
करुया माय वंदना, करुया दूर कोरोना।।