अमरावती- राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या, तसेच इतर दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयाची भेट घेतली. दुर्देवाने या कुटुंबांवर आपत्ती ओढवली आहे. मात्र, त्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, तर एक बहीण म्हणून सदैव त्यांच्या पाठीशी राहील, अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी त्यांचे सांत्वन केले.
भातकुली तालुक्यातील धामोरी येथील नावेद्दिन अयमोद्दीन नावाचा १९ वर्षीय युवक तलावात बुडाल्याची पालकमंत्र्यांनी माहिती मिळताच त्यांनी या गावाला तत्काळ भेट दिली व त्याच्या कुटुंबियांना दिलासा दिला. यावेळी दुर्घटनास्थळाची पाहणी करून त्यांनी रेस्क्यू टीमलाही निर्देश दिले. ही घटना अत्यंत दुर्देवी असून, असे प्रकार घडू नयेत, यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीनेही उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले. तर या तरुणाच्या कुटुंबियांना सर्व प्रकारची मदत मिळवून देऊ, असेही त्यांनी सांगितले. तसेच भातकुली तालुक्यातील पांढरी खोलापूर येथील आत्महत्या केलेल्या शेतकरी ज्ञानेश्वर सरोदेच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना दिलासा दिला.