अमरावती - कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज ज्येष्ठ नेते व माजी शिक्षक आमदार बी. टी. देशमुख यांच्याशी चर्चा करून मार्गदर्शन घेतले. त्यानुसार रेड झोनमध्ये उपविभाग तयार करून सर्व्हेक्षण, तपासणी यांची संख्या वाढविण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.
जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी रेड झोन व परिसरात उपविभाग तयार केले पाहिजेत. सूक्ष्म नियोजनाद्वारे प्रभावीपणे उपाययोजनांची अंमलबजावणी केली पाहिजे, अशी सूचना देशमुख यांनी केली. जिल्ह्यात आतापर्यंत झालेली उपाययोजनांची अंमलबजावणी, जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचना, स्थानिक स्थिती, संभाव्य स्थिती व प्रादुर्भाव थांबविण्यासाठी नव्याने करावयाचे उपाय आदी बाबींसंदर्भात सविस्तर चर्चा यावेळी झाली.
कोरोना पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांनी घेतली माजी आमदार बी.टी.देशमुख यांची भेट रेड झोनमध्ये अधिक लक्ष केंद्रित होणे आवश्यक आहे. तपासण्यांची संख्या वाढवली पाहिजे. रेड झोन परिसराचे उपविभाग करून त्यात अधिक जोखमीचा परिसर, कमी जोखीम असलेला भाग असे वर्गीकरण करून तीव्रतेनुसार कार्यवाही व्हावी. त्यामुळे अतिजोखमीच्या परिसरात अधिक प्रतिबंधक उपाय योजणे, आवश्यक पथक नेमणे, तपासणी, संशयितांची माहिती मिळवणे, थ्रोट स्वॅब घेणे आदी कामे प्रभावीपणे करणे शक्य होईल. त्यानुसार प्रशासनाने कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
ठाकूर यांनी माजी आमदार बीटी देशमुख यांची भेट घेऊन कोरोनाच्या संकटावर मात करण्याकरिता त्यांच्या दीर्घ अनुभवातून काही मार्गदर्शन मिळावे याकरिता चर्चा केली. कोरोना संकट कोण्या एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून सकल मानवजातीवर आलेले हे संकट आहे. अशा परिस्थितीत राजकारणापलीकडे जाऊन प्रखर इच्छाशक्तीने व मोठ्या मनाने काम करण्याची आवश्यकता असते. जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यावर तंतोतंत खऱ्या उतरल्या आहेत. माजी आमदार बी.टी देशमुख यांची भेट घेऊन त्यांनी हे सिध्द करुन दाखविले. देशमुख यांनी आपल्या आयुष्याचे दोन तप समाजकारण व राजकारणासाठी वाहिले आहे. अशा व्यक्तीच्या दीर्घ अनुभवाचा व मार्गदर्शनाचा या संकटाकाळात फायदा व्हावा याकरिता पालकमंत्री ठाकूर यांनी त्यांची भेट घेऊन कोरोना संक्रमण रोखण्यासंदर्भातील नव्या उपाययोजनांवर चर्चा केली. यावेळी देशमुखांनीसुध्दा आपले मोलाचे मार्गदर्शन पालकमंत्र्यांना केले व उज्ज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या.