अमरावती - कोरोना काळात जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवेचे कर्तव्य राज्यातील अंगणवाडी व आशा सेविका बजावत आहेत. कर्तव्य बजावत असताना राज्यातील आठ अंगणवाडी सेविकांना कोरोनाची बाधा झाली व त्यांचा मृत्यू झाला. अशा अंगणवाडी सेविकाच्या कुटुंबाना राज्य सरकारकडून ५० लाख रुपयांची मदत दिली गेली.अमरावती जिल्ह्यातील रामा साऊर येथील उषा पुंड या अंगणवाडी सेविकेला कोरोनाची बाधा झाल्याने काही महिन्यांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते उषा पुंड यांच्या कुटुंबाला रविवारी ५० लाखा रुपयांचा धनादेश देण्यात आला.
यशोमती ठाकुरांच्या हस्ते ५० लाख रुपये मदत देण्यात आली अंगणवाडी सेविकांचे योगदान अमूल्य -
कोरोनाविरुद्धच्या लढाईत अंगणवाडी सेविकांचे योगदान मोठे आहे. आपल्या प्राणांची बाजी लावून गेल्या एका वर्षापासून लढवय्या वृत्तीने सेविका कार्यरत आहेत. याच लढाईत आपला प्राण दिलेल्या उषा पुंड यांचे देशासाठी व समाजासाठीचे योगदान अमूल्य आहे. शासन कोरोना लढवय्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.
शासन खंबीरपणे पाठीशी -
आशा व अंगणवाडी सेविकांनी कोरोना काळात मोलाचे योगदान दिले व देतही आहेत. शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. एकात्मिक बालविकास योजनेत कोरोनाकाळात सेवारत असलेल्या अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका यांचे निधन झाल्यास सहाय्य दिले जाते. या काळात मृत्यू झालेल्या सेविकांच्या कुटुंबीयांना मदत मिळवून दिली जाईल, असेही ठाकूर यांनी सांगितले. उपस्थित आशा सेविका, पर्यवेक्षक यांच्याशीही त्यांनी संवाद साधला.