अमरावती - कोरोनामुळे परिस्थिती गंभीर आहे. आपल्याकडे ऑक्सिजन आणि औषधांचा साठा अपुरा आहे. आपण कठीण परिस्थितीला सामोरे जात आहोत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची ही वेळ नाही. सर्वांनी परिस्थिचे गांभीर्य ओळखायला हवे, असे आवाहन जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे.
जिल्ह्यात सोमवारपासून 'स्टीम' सप्ताह -
आपण कोरोनाबाबत गंभीर राहिलो नाही, त्यामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. पुन्हा एकदा सर्वांना स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे. प्रत्येकाने स्टीम अर्थात वाफ घ्यायला हवी. वाफेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने अमरावती जिल्ह्यात सोमवारपासून स्टीम सप्ताह आयोजित करण्यात आला असल्याची माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली. या स्टीम सप्ताहाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेतली. या बैठकिला खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, आमदार रवी राणा, आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, जिल्हाधिकरी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस अधीक्षक हरी बाळाजी एन, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे उपस्थित होते.
ऑक्सिजन निर्मितीचे नियोजन
ऑक्सिजन निर्मितीच्या नियोजनावर बैठकीत चर्चा झाली. ऑक्सिजन निर्मितीसाठी काही मंडळींशी बोलणे सुरू आहे. मात्र, ऑक्सिजन निर्मितीला 30 दिवस लागणार, असे यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले.