अमरावती -जिल्ह्यातील नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्या आणि त्यांच्यातील कामगार यांच्यात मागील तीन महिन्यांपासून वाद सुरू आहे. या वादाचा भडका आज उडाला. आज संतप्त कामगारांनी आपल्या कुटुंबीयासह कंपन्याच्या गेटवर हल्ला चढवला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नांदगाव पेठ एमआयडीसी येथील रतन इंडिया वीज कंपनीत दोनशे पेक्षा जास्त कामगार काम करतात. या सर्व कामगारांना तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. दरम्यान, एमबीपीएल या कंपनीचे रतन इंडिया वीज कंपनीला कामगार पुरवण्याचे कंत्राट 30 जूनला संपत आहे. अशा परिस्थिती कंपनीचे मुख्य व्यवस्थापक कंपनीकडे फिरकले देखील नाही. 30 जूननंतर या कंपनीचा रतन इंडिया प्रकल्पाशी कुठलाही संबंध राहणार नाही. त्यामुळे त्या अगोदर या कामगारांचे वेतन मिळणे गरजेचे आहे. या कारणाने कामगार संतप्त झाले आहेत.
आज कामगार आपल्या कुटुंबीयांसह कंपनीच्या गेटवर पोहोचले आणि गेटवर असलेल्या सुरक्षा रक्षकाला आतमध्ये सोडण्याची विनंती केली. या दरम्यान, सुरक्षा रक्षक आणि कामगार यांच्यात वाद झाला. तेव्हा कामगारांनी कंपनीच्या गेटवर हल्ला चढवला. दरम्यान, कामगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी खासदार नवनीत राणा, मंत्री बच्चू कडू यांनीही प्रयत्न केले. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.