अमरावती - जिल्ह्यातील कारागृहामधील बंदीजनांकडून मास्कनिर्मिती होत असतानाच आता महिला बचत गटांनीही मास्कनिर्मितीत आघाडी घेत अत्यल्प कालावधीत 36 हजार मास्कची निर्मिती केली आहे. कोरोना प्रतिबंधासाठी महिला शक्ती सरसावली असून, जिल्ह्यातील 57 महिला बचत गट मास्कनिर्मितीत योगदान देत आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या लढाईत मास्कचा तुटवडा भासू नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर मास्कनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवून कारागृहातील बंदीजनांकडून, तसेच महिला बचत गटांकडूनही मास्कनिर्मिती करण्याचे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले होते. त्यानुसार, जिल्ह्यात 57 बचत गटांच्या माध्यमातून आतापर्यंत 36 हजाराच्यावर मास्कची निर्मिती करण्यात आली आहे. हे मास्क हे माफक दरात उपलब्ध करून दिले जात असून योग्य रितीने स्वच्छ करून पुनर्वापर करण्याच्या योग्यतेचे आहेत. याद्वारे महिला बचत गटाला रोजगारही उपलब्ध होत आहे आणि जनतेसाठी माफक दरात व चांगल्या गुणवत्तेचे मास्क उपलब्ध होत आहेत.
उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बचत गटातील महिला ग्रामस्तरीय कोरोना नियंत्रण व स्वच्छता समिती मार्फत गावामध्ये करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेमध्ये हातभार लावत आहेत. त्याबरोबरच मास्कची निर्मिती करून करून कोरोनाविरोधातील शस्त्र जनतेला उपलब्ध करून देत आहेत, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.