अमरावती- अनैतिक संबधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. शहरातील चांदुर बाजार तालुक्यातील करजगाव येथे ही घटना घडली.
३ एप्रिलला रविंद्र उर्फ रवी पवार(४५) यांची हत्या झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करत आरोपीचा शोध लावून मृताची पत्नी व तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मृत रवींद्र पवारची पत्नी अर्चना पवार (वय ३०) व आरोपी अजय अंबाडकर (रा. थुगाव पिपरी) या दोघांचे गेल्या काही महिन्यापासून अनैतिक संबध असल्याचा संशय हा रवींद्रला होता. संशयाच्या भरात रविंद्र दारू पिऊन अर्चनाला वारंवार मारहाण करून जीवे मारण्याची धमकीही देत होता. या भितीपोटी अर्चना व तिचा प्रियकर अजय यांनी कट रचुन अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा कायमचाच काटा काढण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे घटनेच्या दिवशी अजय, रवींद्र व त्याची अर्चना हे शेती लागवडीचे पैसे आणण्यासाठी गेले. त्याठिकाणी अजयने रविंद्रला दारू पाजली. घरी परतत असताना अजयने रस्ता खराब असल्याचे सांगत दोघांना काही अंतर पायी येण्यासाठी सांगितले.
त्यावेळी आरोपी अजय हा आपली दुचाकी घेऊन पुढे जाऊन थांबला. तेव्हा मागून येणारे रविंद्र व त्याची पत्नी अर्चना जवळ येताच आरोपी अजय अंबाडकरने रविंद्रच्या डोक्यात काठीने घाव घातला. तर पत्नी अर्चनाने आपल्याच पतीवर विळ्याने वार करून पतीची हत्या केली. त्यानंतर या दोघांनी मृतदेह फरफटत नेऊन एका विहिरीत टाकला. याप्रकरणी आरोपी अजय अंबाडकर व आरोपी पत्नी अर्चना पवार हीला करजगाव पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास करजगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार मुकुंद कवाडे करत आहेत.