अमरावती -येथील जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल कोरोना पॉझिटिव्ह महिलेने सोमवारी (15 जून) एका गोंडस मुलीला जन्म दिला. कोविड रुग्णालयाच्या डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांच्या चमूने रुग्णालयात या महिलेची सुरक्षित प्रसूती केली. आई व बाळ दोघेही सुखरूप असल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी स्वत: उपस्थित राहून महिलेला शुभेच्छा देत बाळाला आशिर्वाद दिला.
अमरावतीतील सिध्दार्थ नगर येथील रहिवासी असलेल्या गर्भवती महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिला 14 जूनला कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे शहरातील इतर खासगी रुग्णालयांनी सदर महिलेला दाखल करुन घेण्यासाठी नकार दिला होता. या महिलेला आरोग्य विभागाच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलेल्या जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले. डॉक्टर व चमूने अथक परिश्रम घेऊन या महिलेची दुसऱ्या दिवशी सुरक्षित प्रसूती करण्यात आली. सदर महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला. सध्या बाळ व माता दोघेही सुदृढ स्थितीत असून आजरोजी त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यानिमित्त पालकमंत्री ठाकूर यांनी रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन माता व बाळाची भेट घेतली. यावेळी पालकमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन सदर महिलेचे अभिनंदन केले, तसेच नवजात चिमुकलीलाही हातात घेऊन तिचे कौतुक केले.
कोरोना संकटकाळात जिल्हा कोविड रुग्णालयातील पथक अथक परिश्रम घेत कामे करत आहेत. या काळात आरोग्य यंत्रणेच्या दृष्टीने निर्माण होणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करण्यात येत आहे. गर्भवती महिलेवर उपचार सुरू असताना तिच्या आरोग्य सुधारणेची काळजी घेत यशस्वीपणे प्रसुती करण्यात आली. प्रसूतीसाठी जिल्हा कोविड रुग्णालयात तत्काळ प्रसूती कक्षाची व्यवस्था करण्यात आली. प्रसुती तज्ज्ञांसह पीपीई कीट व इतर साधनसामग्री सुसज्ज ठेवण्यात आली. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेने बाळाला जन्म दिला. कोरोना रुग्णालयात उपचारानंतर बाळ व महिलेला आज सुखरूपपणे घरी परतता आले आहे. या घटनेबद्दल आनंद व्यक्त करत पालकमंत्री ठाकूर यांनी स्वत: रुग्णालयाला भेट देऊन आई व बाळाचे कौतुक केले.
महिला व बालविकास मंत्री ठाकूर यांनी रुग्णालयाच्या पथकाचे अभिनंदन करत आभार मानले आहेत. कोविड रुग्णालयातील टीम जीवाची पर्वा न करता कोविड रुग्णांची सेवा करत असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. जिल्हा कोविड रुग्णालयातून दाखल रुग्णांपैकी 68 टक्के रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी परतले आहेत. इतर रुग्णांवरही सुसज्ज यंत्रणेद्वारे उपचार होत आहेत. तीन शिफ्टमध्ये डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी गत साडेतीन महिन्यांपासून अविरत परिश्रम घेत आहेत. कोरोना संकटकाळात रुग्णसेवेची जबाबदारी ही टीम समर्थपणे पार पाडत आहे. त्यामुळेच या कोरोना वॉरिअर्सचे मनोबल उंचावण्यासाठी मेडिटेशन व ध्यानधारणेसारखे उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.
लॉकडाऊनमध्ये शिथिलीकरण आले असले तरीही अजून आपली कोरोनाविरुद्धची लढाई संपलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी दक्षतेचे सर्व नियम पाळून कोरोना हद्दपार करण्याच्या प्रयत्नांना साथ द्यावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. रवी भूषण, प्रसुती तज्ज्ञ डॉ. सुषमा शेंद्रे, भूलतज्ज्ञ डॉ. अनुप बोंद्रे व चिल्ड्रन स्पेशालिस्ट स्वप्नील पाटील आदींनी महिलेच्या सुरक्षित प्रसूतीसाठी प्रयत्न केले.