अमरावती- परतीच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हाती आलेले पीक गेल्याने शेतकऱ्यांना किमान त्याची नुकसान भरपाई तरी तात्काळ मिळावी, यासाठी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी दर्यापूर येथील उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांच्या कार्यालयात निवेदन सादर करण्यासाठी गेले होते. मात्र, उपविभागीय अधिकारी आंबेकर यांनी शेतकऱ्यांसोबत अरेरावीची भाषा वापरली होती. त्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्यावतीने उपविभागीय कार्यालयात काळे झेंडे दाखवत ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांनी झालेल्या प्रकारावर माफी मागितली आहे.
दर्यापूर महिला उपविभागीय अधिकाऱयाची शेतकऱयांना अरेरावी या लिंकवर क्लिक करा आणि वाचा सविस्तर प्रकरण -
उपविभागीय अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांना 'अरेरावी'; नेमके काय घडले?
युवक काँग्रेसच्यावतीने काळे झेंडे दाखवून दर्यापुरात हे आंदोलन करण्यात आले. चार दिवसांपूर्वी युवक काँग्रेसचे पदाधिकारी सागर देशमुखसह शेकडो शेतकरी हे नुकसान भरपाईचे निवेदन देण्यासाठी उपविभागीय कार्यालयावर गेले होते. परंतु त्यावेळी उपविभागीय अधिकारी यांनी फक्त पाच लोकांनी आत यावे, अशी अट घातली होती. यावेळी संतापलेले शेतकरी आणि उपविभागीय अधिकारी यांच्यात बाचाबाची झाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
युवक काँग्रेसकडून काळे झेंडे दाखवत आंदोलन दरम्यान, या अधिकार्यावर कारवाई करावी, अशी मागणी युवक काँग्रेसने केली होती. परंतु चार दिवस उलटूनही कुठलीही कारवाई न झाल्यामुळे अखेर गुरुवारी युवक काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले. दरम्यान, उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांनी समस्त शेतकऱ्यांची माफी मागितली आहे.