अमरावती- धामणगाव तालुक्यातील निभोरा राज येथील चंद्रभागा नदी पात्रात बुडून ३ मुले आणि आईचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. यावेळी त्या चौघांना वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अन्य दोन महिलाही जखमी झाल्या आहेत. एकादशी निमित्त पूजा केलेले साहित्य नदीत अर्पण करायला गेल्यानंतर ही घटना घडली आहे. यश चवरे (१३), जीवन चवरे(१४), सोहम झेले (१२) पुष्पा चवरे अशी मृत माय लेकांची नावे आहेत. तर यावेळी बुडणाऱ्या या चौघांना वाचविण्याच्या प्रयत्नान इतर दोन महिला देखील जखमी झाल्या आहेत.
पुष्पा चवरे यांनी आज एकादशी निमित्त पूजा केली होती. पुजेचे साहित्य पाण्यात अर्पण करण्याकरीता पुष्पा या आपल्या मुलांसोबत गावाशेजारच्या नदीवर गेल्या होत्या. त्यावेळी तीनही मुले अंघोळीसाठी नदी पात्रात उतरली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्याच्या मुख्य प्रवाहात गेली आणि नदी पात्रातील खड्ड्यामध्ये बुडाली. त्यांना वाचविण्यासाठी पुष्पा चवरे या नदी पात्रात उतरल्या, मात्र त्यांचाही बुडून मृत्यू झाला आहे.