अमरावती- राज्यासह देशात सध्या महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना पाहता एकट्या महिला घराबाहेर पडायलाही घाबरतात. पण, अमरावतीतील एक 'दामिनी' मात्र, बिनदास्तपणे अमरावतीच्या रस्त्यावर सकाळी दहा ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत फिरते. तिच्या या बिनधास्तपणाला तिच्या पतीचे प्रोत्साहन आहे. पतीच्या पाठिंब्याच्या जोरावर तिने चक्क रिक्षा चालवून संसाराचा गाडा हाकायला हातभार लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ती आता परिसरातील महिलांसाठी आदर्श बनली.
अमरावतीच्या लक्ष्मी नगर मधील एका झोपडपट्टीतील एका भाड्याच्या खोलीत राहणारे गजभिये परिवार. घरात चार जण आणि कमविणारा एक. मुलांना चांगले शिक्षण मिळावे, आपले चांगले घर असावे, अशी स्वप्ने उराशी बाळगुण अरविंद गजभिये दुसऱ्याच्या मालवाहू रिक्षावर चालकाचे काम करत होते. पण, मिळणाऱ्या मोबदल्यातून त्यांचे प्रपंच व्यवस्थित चालत नव्हते. मग, त्यांच्या पत्नी सुप्रियाने त्यांना मालवाहू रिक्षा घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर अरविंदने मालवाहू रिक्षा घेत चालवू लागले. मालवाहु रिक्षा चालवून दिवसभरातून तीनशे ते चारशे रुपयेच अरविंदला मिळू लागले. पण, शैक्षणिक खर्च वाढल्याने त्यांना सतत पैशाची चणचण भासू लागली. मग, अरविंद यांच्या डोक्यात कल्पना आली की, सुप्रियाही आपल्यासारखेच रिक्षा चालवू लागली तर. त्यांनी हा विचार सुप्रियांना बोलून दाखवला आणि सुप्रियानेही त्याला होकार दिला. मग, अरविंदने सुप्रियाला रिक्षा चालवायला शिकवले. दोघांनी पैसे जमा करत एक प्रवासी रिक्षा घेतली. त्यानंतर आता रिक्षा चालवत आहेत.