अमरावती - अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा दुर्गम भाग आहे. चिखलदरा आणि धारणी हे दोन तालुके या मेळघाटमध्ये समाविष्ट आहेत. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या मेळघाटाला निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभले आहे. पण दुर्दैवाने येथे आरोग्य यंत्रणा फार सुदृढ नसल्याने अंधश्रध्दा येथे मोठ्या प्रमाणावर फोफावली आहे. आरोग्य सुविधा घेण्याऐवजी मंत्रिकाकडे उपचार घेण्यास येथील बहुतांश आदिवासी बांधव पसंती देतात. यातून अनेकांना आपल्या प्राणाला देखील मुकावं लागलं आहे. अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा मेळघाटमध्ये समोर आली आहे.
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील जामली आर हे शे-दोनशे उंबरठ्याचं एक छोटं गाव. आदिवासी बहुल भाग असल्याला या गावात फुलवंती कासदेकर ही ३० वर्षीय महिला आपल्या दोन मुले आणि मुलीसह राहत होती. प्रतिकुल परिस्थितीमध्ये हे कुटूंब आपला उदरनिर्वाह चालवत होते. शनिवारी रात्री घरी झोपेत असताना सापाने फुलवंती बाईला दंश केला. आपल्याला कुणीतरी चावा घेतला हे लक्षात येताच महिलेने सगळ्याने झोपेतून उठवले. आपल्याला सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच फुलवंती कासदेकर हिने थेट परिसरात भूमका बाबा अर्थात मंत्रिकाचे घर गाठले. मांत्रिकाने मंत्रोपचार केले. त्यानंतर प्रकृती सुधारण्याऐवजी खालावत गेली. त्यानंतर त्यांनी नजीकच्या टेम्बुरसोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलेला हलवले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर महिलेला अमरावतीच्या सामान्य जिल्हा रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आले. परंतु वाटेतच तिचा मृत्यू झाला. ही कहाणी एकट्या फुलवंती कासदेकर या महिलेची नाही तर दरवर्षी अनेक महिला या भोंदू बाबाकडे उपचारासाठी जातात आणि आपला जीव गमावून बसतात.
मेळघाटामध्ये कुपोषणाचे प्रमाण कमी नाही. मोठ्या प्रमाणावर येथील बालक आजही कुपोषित आहेत. अनेक बालकांना पोटफुगी सारखे गंभीर आजार होतात. या आजारावर उपचार म्हणून त्यांचे आई-वडील त्यांना भुमका या मांत्रिकाकडे घेऊन जातात. तेथे भुमका हे गरम सळइचे चटके या मुलांच्या पोटावर देतात. चटके दिल्यानंतर पोटदुखी आजार बरा होतो, अशी मानसिकता आहे. भोंदू बाबाकडे चटके घेतल्यानंतर अनेक बालकांचा मृत्यू देखील झाल्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या आहे.
पोलिसांत तक्रार देण्यास टाळाटाळ -
मुलाचा मृत्यू झाल्यानंतर नेमकं कोणत्या भोंदू बाबाकडे उपचार घेतला आहे, हे सांगण्याची हिंमत देखील आदिवासी बांधवांमध्ये नाही. त्यामुळे हे भोंदुबाबा मोकाट फिरत असतात. म्हणूनच दिवसेंदिवस भोंदू बाबांचा व्यवसाय हा मेळघाटमध्ये फोफावत चालला आहे.