अमरावती -भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव असणाऱ्या पापळ येथे कृषी महाविद्यालयाचा प्रस्ताव मार्गी लागण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तसेच अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सोमवारी केले.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात ४३० केडब्ल्यूपी क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण जलसंपदा कामगार राज्यमंत्री बच्चू कडू, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, सचिव शेषराव खाडे, दिलीप इंगोले, हेमंत काळमेघ प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी यशोमती ठाकूर म्हणाल्या संस्थेच्या मागण्यांबाबत शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. अंगणवाडी सेविका प्रशिक्षण केंद्राच्या रखडलेला अनुदानाचा प्रश्नही सोडविण्यात येईल. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण व कृषी क्षेत्रासाठी मोलाचे कार्य केले, त्यांचा आदर्श मानून काम करणार असल्याचेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.