अमरावती - बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या लख्ख प्रकाशात ३५९ पर्यटकांनी मेळघाट व्याग्र प्रकल्पाच्यावतीने आयोजित निसर्ग अनुभव या उपक्रमांतर्गत जंगलातील रात्रीचा थरार अनुभावला. यावेळी काही पर्यटकांना प्रत्यक्ष वाघ पाहायला मिळाला. तर बुद्ध पौर्णिमेच्या रात्री एकूण १६ वाघांचे दर्शन घडले असल्याचे मेळघाट वन्यजीव विभागाने स्पष्ट केले आहे.
मेळघाट वन्यजीव विभागाच्यावतीने बुद्ध पौर्णिमेला निसर्ग अनुभव हा उपक्रम राबविण्यात आला. चिखलदरा, तारुबंदा, ढाकणा, हरीसाल, कोहा कॅम्प, धुळघात रेल्वे, अकोट वनवृत्त, सेमाडोह, रायपूर, जारीदा, हतरु, चौराकुंड, जमली, बोथा, शहानुर, वान, वासली, शिवापूर, वाशिम जिल्ह्यात येणारे कारंजा सोहळा आणि अकोला जिल्ह्यात येणारे काटेपूर्णा या वन परिक्षेत्रात घनदाट जंगलात ज्याठिकाणी प्राण्यांची गणना होऊ शकेल, अशा ठिकाणी मचाणावर पर्यटकांची व्यवस्था करण्यात आली होती.
या सर्व ठिकाणी मिळून एकूण ४०६ मचाणांची व्यवस्था जंगलात पाणवठ्याजवळ असतील, अशा ठिकाणी करण्यात आली. ऑनलाइन प्रक्रियेद्वारे पर्यटकांच्या ४०६ जागा आरक्षित झाल्या होत्या. यापैकी प्रत्यक्षात ३५९ पर्यटक १८ एप्रिलला जंगलातील थरार अनुभवण्यासाठी पोहोचले होते. प्रत्येक वन परिक्षेत्रात जंगलात उभारण्यात आलेल्या मचाणावर राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.