अमरावती: सोमवारी सायंकाळी राजुरवाडी येथील शेख शिवारात किसन वसंतराव धुर्वे (47) याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. याबाबत किसनचा भाऊ सतीश दुर्वे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान, मृत किसनच्या पत्नीचे गावातील बबलू उर्फ इजाज खान शब्बीर खान पठाण याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हत्येपूर्वी किसनला ही माहिती कळली होती. यामुळे अस्वस्थ होऊन त्याने पत्नीला मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. पत्नीने ही बाब तिचा प्रियकर इजाज खान याला सांगितली. त्यानंतर प्रियकराने किसनचा काटा काढण्यासाठी आपल्या साथीदारांच्या मदतीने त्याला राजुरवाडी येथील एका शेतात बोलावले. तेथेच किसनचा गळा आवळून हत्या केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले.
तिघांना अटक:या प्रकरणात पोलिसांनी आरोपी बबलू उर्फ इजाज खान शब्बीर खान याच्यासह त्याचे साथीदार सागर रमेश मातकर आणि एका अल्पवयीन बालकास चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी सक्तीने विचारपूस केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तिघांना अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, उभविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात या प्रकरणाचा तपास करण्यात आला. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू पांडे, पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार, पोलीस अंमलदार संतोष मुंदाणे, बळवंत दाबणे, प्रमोद शिरसाट, पंकज पाटे यांनी सहभाग घेतला.