अमरावती- भारताची राज्यघटना ही साधी राज्यघटना नाही. ही राज्यघटना केवळ एका देशापुरती नाही तर त्यात संपूर्ण जगाचा विचार करण्यात आला आहे. राज्यघटना समितीत डॉ. पंजाबराव देशमुख यांची भूमिका महत्त्वाची होती. मात्र, आज राज्यघटनेनुसार देशाची वाटचाल सुरू आहे की नाही अशी शंका वाटते. देश नेमका कुठे चाललाय? आपण प्रगतीकडे चाललो आहोत की मागे चाललो आहोत? याचा विचार करण्याची गरज असल्याचे महसूल व शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-चंद्रपुरातील आदिवासी माना जमातीचा नागदिवाळी उत्सव, 'असा' करतात साजरा
देशाचे पहिले कृषिमंत्री शिक्षण मंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या 121 व्या जयंती उत्सव सोहळ्यात बाळासाहेब थोरात सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, आदिवासी विकास मंत्री नितीन राऊत, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, महापौर चेतन गावंडे, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, आमदार सुलभा खोडके आमदार यशोमती ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी उत्कल नृत्य निकेतनच्या विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर केले. शिवाजी शिक्षण संस्थेच्या तीन यशस्वी विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.अध्यक्षीय भाषणात बाळासाहेब थोरात म्हणाले की, डॉ. पंजाबराव देशमुख यांचा कार्यकाळ हा जगात औद्योगिक क्रांती झाल्यावरचा, पहिल्या आणि दुसर्या महायुद्धाचा कार्यकाळ होता. याच काळात लेनिनचा उदय झाला. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या अमरावती जिल्ह्यात गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराजांसारख्या संतांचाही काळ होता. अमरावती जिल्ह्यातील पापड सारख्या छोट्याशा गावात तिसऱ्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेणारी व्यक्ती पुढे इंग्लंडमधून शिक्षण पूर्ण करते. देशाचे पहिले कृषिमंत्री म्हणून संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे वेधते. ही काही साधी बाब नाही. भारतीय राज्यघटना समितीवर डॉ. पंजाबराव देशमुख यांनी काम केले आहे. संविधान निर्मितीत डॉ. पंजाबराव देशमुख यांचा वाटाही महत्त्वाचा आहे. असे सारे असताना आज मात्र भारतीय संविधानानुसार देश प्रगतीकडे जायच्या ऐवजी देशाला परत मागे नेण्याचे दुर्दैवी कार्य सुरू आहे.