अमरावती -संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात गुरुवारपासून ९ डिसेंबरपर्यंत पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ महिला कबड्डी स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्र-गोवा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात या पाच राज्यातील 61 विद्यापीठांचे महिला संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
अमरावती विद्यापीठात रंगली पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ महिला कबड्डी स्पर्धा - Inter University Women Kabaddi Tournament
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात गुरुवारपासून महिला कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत ६१ विद्यापीठांचे महिला संघ सहभागी झाले आहेत.
सकाळी विद्यापीठ क्रीडा संकुल येथे पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रदीप खेडकडॉ, डॉ. निलेश ठाकरे, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख विदर्भ कबड्डी फेडरेशनचे सदस्य सतीश डफळे आणि क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ.अविनाश असणारे व क्रीडा व शारीरिक मंडळाचे सदस्य प्रमोद चांदूरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
या स्पर्धेत पाच राज्यातील 61 चमू सहभागी झाले असून एकूण सातशे महिला खेळाडूंचा या स्पर्धेत सहभाग आहे. पहिल्या दिवशी एकूण 16 रंगतदार सामने या स्पर्धेत पाहायला मिळाले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर आयोजित पश्चिम विभागीय महिलांचे कबड्डी सामने पाहण्यासाठी अमरावतीकर क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अविनाश असनारे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केले.