अमरावती- तिवसा मतदारसंघातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आमदार यशोमती ठाकूर यांनी धुमाकूळ घातला आहे. यानंतर गुरुकुंज मोझरी गावासाठी गुरुदेवनगर पूरक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत वर्ष 2000-2001 मध्ये शासनाने गुरुकुंज मोझरी ग्रामपंचायतीला दिलेल्या विहिरीवर आज खासगी व्यक्तीची मालकी आहे. पाण्याने तुडुंब भरून असणारी शासन योजनेतील ही विहीर गुरुदेवनगर ग्रामपंचायतने विकली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
महाराष्ट्र शासन नळ पाणीपुरवठा योजनेंतर्गत मौजा विचोरी सर्वे क्रमांक 132 मध्ये गुरुदेवनगर ग्रामपंचायतीला विहीर दिली होती. या विहिरीद्वारे 2002 ते 2009 पर्यंत गुरुकुंज मोझरी गावाची तहान भागविण्यात आली. आता पाणी टंचाईची झळ संपूर्ण अमरावती जिल्ह्याला सोसावी लागत असताना आमदार यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदारसंघातील दुष्काळग्रस्त गावांना पाणी मिळावे यासाठी अप्पर वर्धा धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. अप्पर वर्धा धरणावरून पाणी सोडण्यावरून साध्य जिल्ह्यात राजकारण होत असताना गुरुदेव नगर येथील पाण्याने तुडुंब भरलेला ग्रामपंचायतीची विहीर तळेगाव ठाकूर येथील रहिवासी नंदकीशोर रामलाल जयस्वाल यांच्या ताब्यात असल्याचे आणि ती जयस्वाल यांच्या नावावर असल्याचे लक्षात येताच शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य राहुल लांजेवार यांनी या प्रकाराबाबत आक्षेप घेतला.