अमरावती :कोम्रेड्स जागतिक मॅरेथॉन स्पर्धेत बाजी मारणाऱ्या दीपमाला साळुंखे बद्रे, दिलीप पाटील आणि ललित कुमार वराडे यांचे अमरावती रेल्वे स्थानकावर स्वागत झाले. त्यानंतर त्यांची रेल्वे स्थानकापासून जिल्हा स्टेडियमपर्यंत शहरातून खुल्या जीपमध्ये मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताशा वाजवीत मिरवणूक काढण्यात आली. अमरावती शहरातील धावपटूंनी यावेळी जल्लोष केला. जिल्हा स्टेडियम येथे या तिन्ही स्पर्धाकांचा अमरावतीकरांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
'अशी' आहे कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा :कॉम्रेड मॅरेथॉन ही 90 किलोमीटरची अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा आहे. दक्षिण आफ्रिकेतील क्वायझुल्लू नताल प्रांतात दरवर्षी डरबन आणि पीटर मरीडसबर्ग या दोन शहरांदरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत 90 किलोमीटर अंतर पार करताना सहा टप्पे असतात. ते सर्व टप्पे ठराविक वेळेत स्पर्धकांना पूर्ण करावे लागतात. 90 किलोमीटर अंतर बारा तासात पूर्ण करणाऱ्यांनाच पदक दिले जाते. या स्पर्धेत दीपमाला साळुंखे बद्रे यांनी 90 किलोमीटरचे अंतर अकरा तास दहा मिनिटांमध्ये गाठले, तर ललित कुमार वराडे यांनी दहा तास 42 मिनिट आणि दिलीप पाटील यांनी दहा तास 41 मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली.