अमरावती- हिरव्यागार निसर्गाचा व मनाला भुरळ घालणारा अद्भूत नजरा मेळघाटाचा आहे. निसर्गाच्या सानिध्यात दडलेल्या या मेळघाटाची ओळख त्याच्या सौंदर्याने देशभरात आहे. परंतु, या मेळघाटाच्या नशिबी बालमृत्यू, माता मृत्यू, कुपोषण, बेरोजगारी असे अनेक भोग स्वतंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही सुटले नाहीत. सरकारे अनेक बदलली पण मेळघाटाच्या कवेला घट्ट पकडून असलेला पाणी प्रश्न आजही कायम आहे. हंडा भर पाण्यासाठी डोंगर दऱ्यातून दीड किलोमीटरचा प्रवास महिला, लहान मुलींना याठिकाणी करावा लागत आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने विशेष आढावा घेतला आहे.
आम्ही कोरोनाने नाही तर गढूळ पाण्याने मरू हेही वाचा-कोरोना : दिवसभरात ७७१ नवे रुग्ण, राज्याचा आकडा १४ हजार ५४१ वर
पाण्यामुळे विविध आजार...
चिखलदरा तालुक्यातील एकझीरा गावातील रामराती साठे या 60 वर्षीय महिलेचा 10 वर्षांपूर्वी विवाह झाला. दहा वर्षात या गावात पती सोबत उपलब्ध परिस्थितीत संसार चालू ठेवला. परंतु, मागील दहा वर्षात कधी मुबलक आणि शुद्ध पाणी मिळाले नसल्याचे या महिलेने सांगितले. गावापासून डोंगर दरीत उतरल्यावर एका विहरितून त्यांना पाणी आणावे लागते, ते सुद्धा गढूळ. आतापर्यंत अनेक महिलांना या पाण्यामुळे विविध आजार झाले आहेत. त्यामुळे 'आम्ही कोरोनाने नाही तर हे पाणी प्यायल्याने मरू', अशी स्थिती येथील नागरिकांची झाली आहे.
दगड गोट्यांना तुडवत दीड किलोमीटर पाण्यासाठी वणवण..
दुपारच्या दोन वाजताच्या किर्रर उन्हात डोगर दऱ्यातून वाट काढत पाण्यासाठी दगड गोट्यांना तुडवत दीड किलोमीटर चालत पाण्यासाठी या महिला भटकत आहेत. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील एकझीरा गावातील साडेसहाशे लोकसंख्येच्या या गावात दरवर्षी मार्च महिला लागला की या महिलांची पाण्यासाठी भटकंती होते.
गावातील 32 महिलांना वेगवेगळ्या आजराने ग्रासले...
या गावात पाणीपुरवठा योजनेसाठी मागील चार वर्षात दोन बोरवेल मारले. पण पाणी काही लागले नाही. गावातील विहरीचे खोलिकरण केले पण काही फायदा झाला नाही. त्यामुळे सकाळी पाच वाजता पासून या गावातील नागरिकांची पाण्यासाठी डोंगर दऱ्यातून पायपीट सुरू असते. ज्या ब्रिटिश कालिन विहरितून या आदिवासी महिला पाणी आणतात त्या विहरीत फक्त दोन फूट पाणी आणि तेही गढूळ असल्याने या गावातील 32 महिलांना वेगवेगळ्या आजराने ग्रासले होते. त्यामुळे आम्ही कोरोनाने नाही तर या विहरीतील पाणी प्यायल्याने मरून जाऊ अशी चिंता या महिलांनी व्यक्त केली आहे.
जीवघेणी कसरत...
पाण्यासाठीचा संघर्ष हा अदिवासी महिलांसाठी नवीन नाही. हे भयानक दृश्य एकट्या एकझीरा गावचे नाही. मेळघाटातील अशा असंख्य गावातील महिला पाण्यासाठी डोंगर दऱ्यातून जीवघेणी कसरत करतात. डोक्यावर दोन हंडे घेऊन अनवावी पायांनी उन्हाचे चटके सोसत दगड तुडवत या महिला डोंगर माथ्यावर चढाई करतात.
जनावरांचेही हाल...
मेळघाटातील भीषण पाणीटंचाईचा फटका हा फक्त इथल्या माणसांनाच बसतो असे नाही तर जनावरांना देखील पाणी पाजण्यासाठी डोगर दऱ्यातून न्यावे लागते. पाणी भरायला चिमुकल्या मुली सुद्धा जात असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
कुणाच्या भांड्यात पाणी पडते तर मग कुणाचे भांडे रिकामे...
विहिरीला फार पाणी नसल्याने आता गावात दर एक दिवसाआड पाण्याचा ट्रकर येतो. त्यातही मुबलक पाणी नसल्याने महिलांची गर्दी होते. कुणाच्या भांड्यात पाणी पडते तर मग कुणाचा भांडे रिकामे. पण पुन्हा सुरू होतो या महिलांचा डोगर दऱ्यातून पाण्यासाठीचा प्रवास.
पाणीटंचाई जेवढी नैसर्गिक, त्याच्यापेक्षाही ती प्रशासन निर्मित...
दरवर्षी मेळघाटात पाणी टंचाई निवारणासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. परंतु, पाणी मात्र शासनाच्या कागदपत्रांवरुनच खळखळते. मेळघाटातील पाणीटंचाई जेवढी नैसर्गिक आहे. त्याच्यापेक्षाही ती प्रशासन निर्मित आहे. अमरावती जिल्ह्याचे नेतृत्व दोन महिला लोकप्रतिनिधी करत असताना मात्र याच जिल्ह्यातील मेळघाट मधील महिलांना पाण्यासाठी होणाऱ्या वेदना थांबणार कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.