अमरावती -कृषी कायद्याविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. याबाबत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेत ४ डिसेंबरला तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज मोझरी येथून दुचाकीने हजारो शेतकऱ्यांसोबत दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सहभागी होणार असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.
बच्चू कडू यांची प्रतिक्रिया शेतकऱ्यांना सन्मानाने येऊ द्यावे -
केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांना सन्मानाने दिल्लीत येऊ द्यावे व त्यांच्याशी प्रामाणिकपणे संवाद करावा, असेही बच्चू कडू यांनी सांगितले. तसेच यवतमाळ येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 50 टक्के नफा देऊन हमीभाव देतो असे सांगितले होते व शेतकऱ्यांना हे वचन दिले होते, याची आठवणही बच्चू कडू यांनी करून दिली.
याआधी गुजरातमधील आंदोलनात झाले होते सहभागी -
बच्चू कडू हे नेहमीच त्यांच्या आगळ्यावेगळ्या आंदोलनाने चर्चेत असतात. यापूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन केले होते. तीन वर्षांपूर्वी बच्चू कडू यांनी गनिमीकावा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगर येथे जाऊन आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांना रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला होता; परंतु पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बच्चू कडू हे वडनगरमध्ये पोहोचले होते. दरम्यान आता या आंदोलनातही बच्चू कडू दिल्लीमध्ये जाऊन कशा पद्धतीने डेरा देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा - राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आणि यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांचा जातेगाव घाटात खून