महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Melghat Waterfall : पांढऱ्या शुभ्र पाण्यासह मेळघाटातील धबधबे मोहरले; पर्यटकांची उसळली गर्दी - पर्वतांवरील धबधबे जिवंत झाले

अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेत झालेल्या समाधानकारक पावसामुळे पर्वतांवरील धबधबे जिवंत झाले आहेत. स्वच्छ अशा पांढऱ्या शुभ्र पाण्याने कोसळत असलेल्या या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मेळघाटात मोठी गर्दी झाली आहे.

Melghat Waterfall
पावसाळ्यात बहरले मेळघाटचे सौंदर्य

By

Published : Jul 24, 2023, 4:48 PM IST

Updated : Jul 24, 2023, 6:58 PM IST

मेळघाटात पावसाने दिले धबधब्यांना जीवदान

अमरावती :अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या मेळघाटात अनेक ठिकाणी पर्वतांवरून धबधबे कोसळायला लागले आहेत. मागील 15 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण मेळघाट न्हाऊन निघाला आहे. सध्या जवळपास सर्वच कोसळणारे धबधबे स्वच्च पांढऱ्या शुभ्र पाण्याचे दिसत असल्यामुळे पर्यटकांची गर्दी हे धबधबे पाहण्यासाठी मेळघाटात वाढली आहे.


सातही धबधबे झाले वाहते :मेळघाटातील धारणी तालुक्यात धारणीपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर सातपुडा पर्वतावर सर्वांत उंच ठिकाणी वसलेल्या गोलाई या गावात येथील सर्वांत अप्रतिम धबधबा पाहायला मिळतो. या ठिकाणी पर्वताच्या एकूण 7 टप्प्यांवर हा धबधबा एकूण सात ठिकाणी विविध स्वरूपाचा दिसतो. यामुळे गोलाई परिसरात एकूण 7 धबधबे कोसळत असल्याचे पाहायला मिळते. पहिला धबधबा जेथे कोसळतो त्या ठिकाणी कपारीमध्ये महादेवाची पिंड आहे. श्रावण महिन्यात या ठिकाणी गोलाईसह लगतच्या गावातील भाविक तसेच लागूनच असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील अनेक पर्यटक या ठिकाणी खास पर्यटनासाठी आणि महादेवाच्या दर्शनासाठी येतात.


भिमकुंड, चिचाटी धबधब्यांवर गर्दी :विदर्भातील सर्वांत सुंदर पर्यटन स्थळ असणाऱ्या चिखलदरा येथे भीमकुंड या ठिकाणी कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी उसळली आहे. चिखलदरा तालुक्यातच चिचाटी आणि धारखोरा हे प्रसिद्ध असणारे धबधबेसुद्धा पहाडावरून कोसळायला लागले आहेत. श्रावण महिन्यात या सर्वच धबधब्यांचा जोर आणखी वाढणार आहे. या धबधब्याखाली आंघोळ करण्यासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी मेळघाटात उसळते.


चुरणी परिसरातही सुंदर धबधबे :चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या चुरणी, काटकुंभ या परिसरात देखील पहाडांवरून कोसळणारे सुंदर धबधबे आहेत. विशेष म्हणजे, चुरणीवरून परतवाड्याच्या दिशेने येत असताना मध्यप्रदेशच्या सीमेलगत सातपुडा पर्वतावरून वाहणारे धबधबे प्रत्येकाला आकर्षित करतात. सध्या या धबधब्यांचा जोर विशेष असा नसला तरी मुसळधार पावसानंतर या भागात जिकडे-तिकडे सुंदर असे धबधबे पाहायला मिळतात.

प्रत्येक पॉईंटवर गर्दी : चिखलदरा येथे असणारे हरिकेन पॉईंट, भीम कुंड, स्कायवाक पॉईंट, गाविलगड किल्ला, देवी पॉईंट अशा सर्वच महत्त्वाच्या पॉईंट्सवर पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. विशेष म्हणजे, रविवारी पहाटे हातभराच्या अंतरावर असणारा माणूस देखील ओळखता येणार नाही इतके प्रचंड धुके चिखलदऱ्यावर पसरले होते. या धुक्यात फिरण्याचा आनंद अनेक पर्यटकांनी लुटला. या धुक्यामुळे चिखलदरा येथे निर्माण होत असणाऱ्या देशातील सर्वांत मोठ्या स्कायवॉकचे पिलर देखील गु्डूप झालेले दिसतात. सुट्ट्यांच्यामेळे 15 ऑगस्टला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील चिखलदरा येथे पाय ठेवायला देखील जागा नसणार, अशीच परिस्थिती राहणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनिमित्त चिखलदरा येथील सर्व हॉटेल, स्टे होम, एमटीडीसीचे रेस्टहाऊस सारे काही आधीच आरक्षित झाले आहेत.

हेही वाचा:

  1. Koyna reservoir : कोयनेच्या पाणीसाठ्याची हाफ सेंच्युरी; धरणात प्रतिसेकंद 60 हजार क्युसेक पाण्याची आवक
  2. Youth Fall In Kund While Taking Selfie: सेल्फी घेताना तरुण 70 फूट कुंडात कोसळला, बचाव कार्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल
  3. Kolhapur Rain Update: पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली; धोका पातळीकडे वाटचाल, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आदेश
Last Updated : Jul 24, 2023, 6:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details