अमरावती- जिल्ह्यात यावर्षी दुष्काळाची तिव्रता चांगलीच जाणवत असून पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. अमरावती शहरात दोन दिवसांआड नळाला पाणी येत असून ग्रामीण भागात अतिशय विदारक परिस्थिती आहे. पूर्वी केवळ मेळघाटात टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची व्यवस्था करावी लागायची. यावर्षी मेळघाटातील गावांसह अमरावती, चांदुर रेल्वे, मोर्शी आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यातील गावांतही पाणीटंचाई जाणवत आहे. जिल्ह्यातील १९ गावे आज टँकरवर तग धरून आहेत.
अमरावतीत पाण्यासाठी हाहाकार; तहान भागविण्यासाठी टँकरवरच भिस्त चिखलदरा तालुक्यातील भिलखेडा, धरमडोह, बहादरपूर, मनभंग, आडनदी, सोनापूर, पिपदारी, खिरपाणी आणि खटकली गावात टँकरने पाणी पुरवठा केला जातो आहे. अमरावती तालुक्यात बोडना, परसोडा, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोना, चांदुर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर जळका जगताप, सालोरा खुर्द, मोर्शी तालुक्यातील लोहगाव, सावरखेड, आसोना आणि वाघोली या गावांची तहान टँकरद्वारे भागविण्यात येत आहे.
टँकरद्वारे पाणी पुरवठा केल्या जात असलेल्या गावांतील वास्तविकता जणून घेण्यासाठी 'ईटीव्ही भारत' ने चांदुर रेल्वे तालुक्यातील तिन्ही गावांना भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा अनुभव घेतला.
४५०१ लोकसंख्या असणारे आमला विश्वेश्वर हे गाव चांदुर रेल्वे शहरापासून ८ की.मी अंतरावर आहे. या गावात आज ३ हजार लिटरचे दोन टँकर दिवसातून दोन वेळा पाणी आणून गावरतील टाकीत भरतात. दोन्ही टाकीतील पाणी आठवड्यातून एक दिवस नळाद्वारे गावात पुरविले जाते. गावात सध्या एकच हापसा आहे. या हापशाला राहून राहून पाणी येत. पाणी येताच त्यावर पाणी भरणाऱ्यांची गर्दी तुटून पडते.
आमला विश्वेश्वर सारखीच परिस्थिती लगतच्या जळका जगताप या गावाची आहे. भर उन्हात एक आजीबाई विहिरीतून पाणी काढतानाचे या गावातील चित्र अंगावर शहारे आणणारे होते. या गावातही एक दोन दिवसाआड सरकारी टँकर येतो. टँकरचे पाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या टाकीत सोडले जाते. आठवड्यात एक दिवस हे पाणी नळाद्वारे ग्रामस्थांना पुरविले जात असताना आठ दिवसात एक दिवस येणारा नळ हा केवळ अर्धा तास मोठया मुश्किलने सुरू असतो, आशा तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. ज्यांच्याकडे नळ नाही त्यांच्या पाण्याचा प्रश्न मात्र सरकारने मार्गी लावला नाही. ही वास्तविकता जळका जगताप गावात पोचल्यावर लक्षात येते.
सालोरा खुर्द या गावातील पाण्याची समस्या तर आणखी गंभीर दिसली. गावात एकच विहीर आहे. या विहिरीत दिबसभरात तीन चार बादल्या भरतील इतके पाणी जमा होते. दररोज एक टँकर पाणी या विहिरीत ओतल्यावर अख्खे गाव विहिरीवर तुटून पडते. गावात प्रत्येकाच्या घरात २०० लिटरचे चार, पाच ड्रम दिसतात. या टँकरचे पाणी विहिरीत पडताच हे सारे ड्रम भरून ठेवून आपली पाण्याची सोय ग्रामस्थ लावून ठेवतात.
सरकारी टँकरप्रमाणेच खासगी टँकरही आमला विश्वेश्वर, जळका जगताप आणि सालोरा खुर्द गावात पोचत आहेत. २०० लिटरचा एक ड्रम ४० रुपयात भरून दिला जातो. या भागात ज्यांच्या बोअरला कसेबसे पाणी लागले आहे. असे एक दोन शेतकरी टँकरद्वारे पाणी विक्रीचा नवा व्यवसाय करीत असल्याचे पाहायला मिळाले. शेतातील पिकांना, संत्र्यांच्या झाडांना पाणी देण्यासाठी अख्खा टँकर या भागातील शेतकरी विकत घेत आहेत.
एकूण परिस्थिती अतिशय भीषण आहे. पाऊस पडायला अद्याप बराच वेळ आहे. एक दिवस जरी टँकर चुकून आला नाही तर आता कसे? असा प्रश्न या गावातील लोकांच्या मनात धडकी भरविणारा आहे. आमला विश्वेश्वर, जळका जगताप, सालोरा खुर्द या गावांसारखीच टँकरने पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या जवळपास सर्वच गावांची परिस्थिती आहे.