अमरावती-अमरावती शहरातील गावठाण वडाळी परिसरात अमरावती महापालिकेचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. याठिकाणच्या आशा सेविकेसह दोन आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हे आरोग्य केंद्र सील करण्यात आले आहे. त्यामुळे परिररातील रुग्णांची आता तारांबळ झाली आहे.
वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन आरोग्य अधिकाऱ्यांसह एकूण 33 आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत. वडाळी परिसराची एकूण लोकसंख्या 20 हजारांच्या घरात आहे. वडाळीसह लगतच्या राह्यलनगर, बिच्चू टेकडी, चपराशीपुरा या भागातूनही अनेक नागरिक या केंद्रात उपचारासाठी येतात. अवघ्या 10 रुपयात याठिकाणी उपचार मिळतो. मात्र, याठिकाणचे कर्मचारी कारोनाबाधित आढळल्याने हे आरोग्य केंद्र तात्पुरते बंद करण्यात आले आहे.
दरम्यान, आरोग्य केंद्रात कार्यरत वडाळी परिसरातील आशा सेविका, तिवसा येथून येणारे आरोग्य कर्मचारी आणि जळकातून येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोनाचीबाधा झाली. कोरोबाधित तिघांना उपचारासाठी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतर 30 जणांना विविध ठिकाणच्या विलगिकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे.