अमरावती Meditation Center In Melghat: मनाची एकाग्रता साधून त्याद्वारे आपल्या स्वभवतालच्या जगाचं स्वनिरीक्षणाद्वारं स्वतःची आत्मशुद्धी करण्यासाठी, भगवान गौतम बुद्धांनी (Gautam Buddha) शोधून काढलेल्या 'विपश्यना' (Vipassana) अर्थात, खास ध्यान पद्धतीद्वारे जागतिक सत्याचा अनुभव घेता यावा यासाठी 'ध्यान साधना' महत्त्वाची आहे. ही ध्यान साधना खऱ्या अर्थाने साधण्यासाठी मेळघाटात एक तपापासून या ध्यान साधनेचं प्रशिक्षण दिलं जातं. चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या बिहाली येथे उंच पहाडांच्या मध्ये अतिशय शांत ठिकाणी त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीनं धम्म प्रशिक्षण केंद्र चालविलं जातं आहे.
मनुष्य आत्ममग्नतेतून बाहेर पडण्यासाठीची ही चळवळ: आम्ही मनुष्यमात्राला पूर्णत्वाकडे नेण्याची तयारी करीत आहोत. त्यासाठी वाटेल ते कष्ट उपसण्याची आमची तयारी आहे. 'असं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य (Dr. Babasaheb Ambedkar) आहे. या वाक्यानुसार ही चळवळ समोर आली आहे. या चळवळीच्या माध्यमाने मनुष्य आत्ममग्नता आणि आत्ममुक्ततेतून बाहेर कसा पडेल, मनुष्य स्वतःविषयी कसा जागृत होईल, तो स्वतःसह सर्वांसाठी उच्च उत्क्रांतीसाठी सहाय्यक कसा ठरेल, यासाठी 'ध्यान साधना' आवश्यक आहे. या ध्यान साधनेसाठी आम्ही या केंद्रात येणाऱ्यांना मार्गदर्शन करतो, अशी माहिती बिहाली येथील अचल भूमी धम्म प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष, धम्मचारी विवेक चित्त यांनी "ईटीव्ही भारत" शी बोलताना दिली.
ध्यान साधनेला महत्त्व :ध्यान साधना केंद्रात येणाऱ्या विविध वयोगटातील व्यक्तींना विविध स्वरूपात ध्यान साधनेचे प्रशिक्षण दिलं जातं. महिलांसाठी विशेष साधना केंद्र तसेच युवकांसाठी युवा संस्कार शिबिर, यासह वृद्ध काळात स्वतःची स्वतः कशी काळजी घ्यावी, यासाठी देखील या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं. विपश्यनासाठी जाणाऱ्या व्यक्तींची प्राथमिक तयारी देखील या 'ध्यान साधना' शिबिरात करून घेतली जाते. समुपदेशनामुळं या ठिकाणी अनेक व्यक्तींच्या वैयक्तिक समस्या देखील मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जातो. या केंद्रात आल्यावर एकमेकांशी होणाऱ्या संवादाच्या माध्यमातून आपल्या वैयक्तिक समस्या सहज सुटतात.