अमरावती -राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्यात सध्या कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अमरावतीमध्ये सुद्धा विदारक परिस्थिती निर्माण झाल्याने, जिल्हा प्रशासनाने हाय रिक्स असलेले जिल्ह्यातील ११० गावे पूर्णतः सिल करण्याचा निर्णय घेतला आहे. तिवसा तालुक्यातील मोझरी या गावाचा देखील यात समावेश आहे. मोझरी हे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे गाव आहे. मात्र गावात कोरोना नियमांचे पालन होत का? याचा आढावा घेण्यासाठी केलेला हा रियालिटी चेक
अमरावती वरून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोझरी या गावात आज सकाळी 9 वाजता ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी पोहोचले. गावात प्रथम दर्शनी एक फलक ग्रामपंचायतच्या वतीने लावण्यात आले होते. या फलकावर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून लिहिण्यात आले होते. त्याच परिसरामध्ये तरुणाचे एक टोळके बसले होते. या तरुणांपैकी अनेकांनी मास्क घातलेला नव्हता. काही अंतरावरच गावातील शाळा आहे. हा सर्व परिसर शाळेचा चौक आणि शहिद भगतसिंग चौक म्हणून ओळखला जातो. या चौकात सुवर्णकार, टेलर, कृषी सेवा केंद्र, केश कर्तनालय, किराणा, सायकल रिपेअरींग, दूध डेअरी, स्टेशनरीसह छोटे- मोठे दुकाने आहेत. या व्यवसायांपैकी किराणा आणि दुध व्यवसायिकंना सकाळी 11 वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे. तर बाकीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत, मात्र असे असताना देखील येथील अनेक दुकाने सुरूच होती. कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचे निर्दशनास आहे.
दंड करून देखील दुकाने सुरू ठेवत असल्याचा दावा
त्यानंतर आम्ही आणखी पुढे झेंडा चौकाच्या दिशेने गेलो असता, एक कपड्याचे दुकान शटर अर्धे उघडे ठेवून सूरू होते. या दुकानाला ग्रामपंचायतीने दंड केल्याची माहिती मिळाली, मात्र तरी देखील हे दुकान सुरूच होते. यानंतर आम्ही मोझरी गावातील झेंडा चौकात पोहचलो तर या गावात लॉकडाऊनच नसल्याचा भास होत होता, या चौकात देखील कापड दुकान, हार्डवेअर, स्टेशनरी, हॉटेल, कृषी केंद्र, किराणा दुकान आदी दुकान सुरू होते. यातील अनेक दुकानाना ग्रामपंचायतने दंड करून देखील काही व्यवसायीक पुन्हा आपले दुकाने सुरू ठेवत असल्याचं प्रशासनाचे म्हणणे आहे. मोझरी गावातील दलित वस्ती, उमप पुरा, अनकवाडी रोड, कन्या शाळा परिसर, झेंडा चौकाच्या दक्षिणेकडील भागात असलेले तसेच इतर ठिकाणी असलेले किराणा दुकान हे रात्री सुद्धा सर्रास पणे सुरू असल्याचे आमच्या निदर्शनास आले. एकंदरीत परिस्थिती पाहिली तर मोझरी गावात नागरिकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे रियालिटी चेकमधून समोर आले आहे. मोझरी गावातील ही सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर गावचे सरपंच सुरेंद्र भिवगडे, ग्रामसेवक देशमुख आणि गावच्या पोलीस पाटील शुभांगी फालके यांच्याशी संवाद साधला.
काय म्हणतात सरपंच सुरेंद्र भिवगडे?
आमचे गाव शासनाने प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे आम्ही गावाच्या चारही दिशेवर फलक लावले आहे. गावात येणाऱ्या फेरीवाल्यांना आम्ही प्रतिबंध केला आहे. आज शनिवारी इथे बाजार भरत असतो परंतु तो बजार आम्ही भरू दिला नाही. जे लोक नियमांचं पालन करत नाही त्या लोकांना आम्ही दंड करत आहोत. आतापर्यंत जवळपास पाच हजारांचा दंड आम्ही वसूल केला आहे. मात्र दंड केल्यानंतर देखील व्यवसायिक आपली दुकाने उघडी ठेवत आहेत. आम्ही कोरोनाबाधित रुग्णांच्या घरी जावून त्यांना कोरोना नियम पाळण्याचे आवाहन करत आहोत. गावात सॅनिटायझरची फवारणी देखील केली आहे. लॉकडाऊन पाळण्यासाठी आम्हाला पोलिसांच्या मदतीची गरज आहे, तशी मागणी करून देखील गावात फक्त होमगार्डच पाठवण्यात येत असल्याचे सरपंचांनी सांगितले.