अमरावती- भारत देशात गाईला धार्मिक दृष्ट्टया महत्व आहे. याच बरोबर आयुर्वेदाच्या दृष्टीनेही गायीचे दूध, दूग्धजन्यपदार्थ यालाही तितेकचे महत्व आहे. तिच्या पासून मिळणारे शेण, गोमुत्र याचाही सेंद्रीय शेतीसाठी मोठ्याप्रमाणात वापर केला जातो. एकंदरीत विचार केला तर गाय ही शेतकरी आणि पशूपालकांसाठी एक उपयुक्त जनावर आहे. विशेष म्हणजे हिंदू धर्मात गाईला पूजनीय मानले जाते. त्यामुळे देशभरात गोपालनाला प्राधान्य दिले जाते. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात सार्सी या गावात मात्र, गायींची नित्यनियमाने पूजा केली जाते. या गावात चक्क गाईचे मंदिर आहे. विशेष बाब म्हणजे या गावातील गायींना बसायला लोक चक्क कापसाच्या गाद्या आणून देतात, तसेच या गायी गावात मुक्त संचार करतात, कोणाच्याही घरात प्रवेश करतात,त्यावेली त्या गाईंची चक्क पूजा केली जाते, मात्र, या गायीची एवढी सोय का केली जाते त्याबाबत ईटीव्ही भारतने घेतलेला हा खास आढावा..
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील सार्सी या गावात अनेक वर्षापासून गाईला पुजण्याची परंपरा लाभली आहे, पार्वती माता संस्थान सार्शी या ठिकाणी गावाच्या अगदी मध्यभागी गाईचे मंदिर असून येथे जिल्ह्यातुन अनेक जण दर्शनासाठी येत असतात. येथील ग्रामस्थ या मंदिरा विषयी अनेक गोष्टी सांगतात एकच गाईपासून तिचे वंशज आज पर्यंत गावात फिरत असून त्यांची पूजा तसेच व्यवस्था ग्रामस्थांकडून केली जाते.
सार्सी गावातील पार्वती देवस्थानाच्या सध्या तीन गायी आहेत. या गाईंना विश्रांतीला बाहेर गावातील लोक स्वेच्छेने बसायला गाद्या खायला ढेप आणून देतात. या गावातील गाईंची एवढी सोय करण्यामागे मोठा इतिहास असल्याचे येथील गावकरी सांगतात. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील सार्सी या गावाला गाईची सार्सी म्हणून ओळखले जाते. 17 व्या शतकाच्या दरम्यान या गावांमध्ये एक गाय आली होती. ती देवरुपी गाय येथील एका वडाच्या झाडा खाली थांबली होती. पुढे, तिथेच वास्तव्य करणाऱ्या या गाईचा वंश वाढत गेला असल्याचा दावा येथील गावकरी करत आहेत. तेव्हापासून या गावात गाईंची पूजा केली जात असल्याचेही गावकऱ्यांकडून सांगितले जाते.
म्हणून वाढत गेली गाईवरील श्रद्धा, गाईचे एकमेव मंदिर
महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या सालबर्डी येथील जंगलात ही देवरुपी गाय चरत होती. त्यानंतर ही गाय सार्सी गावात वास्तव्य करू लागली. तर जुन्या काळात गावात तीर्थ दंडारी बसत होती, तेव्हापासून गावकऱ्यांची गाईवरील श्रद्धा वाढत गेली. या गावातील गावकऱ्यांची गाईवर इतकी श्रद्धा बसली आहे, की त्यांच्या पूर्वजांनी गावात गाईचे मंदिर निर्माण केले आहे. शक्यतो गाईचे मंदिर कुठेच आढळत नसून ते एकमेव महाराष्ट्रात असल्याचा दावाही सार्सी मधील लोकांनी केला आहे. जर एखादी व्यक्ती आजारी पडली, तर ते लोक या गाईच्या मंदिरात दर्शनाला येतात. दर्शन घेऊन पूजा केल्यानंतर त्यांचा आजार पूर्णपणे बरा होतो, अशी येथील लोकांची भावना आहे. त्यामुळे अनेकांची या गाईंवरची श्रद्धा वाढत गेली आहे.