अमरावती -जिल्ह्यातील वरुड तालुक्यात अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या झुंज या गावातून वाहणार्या वर्धा नदीत मंगळवारी (दि. 14 सप्टेंबर) सकाळी दहा वाजेच्या सुमारास बोट उलटल्याने अकरा जण नदीत बुडाले. यापैकी तिघांचेच मृतदेह हाती लागले आहेत. ही घटना घडण्यापूर्वीचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
बोटीत 13 जण झाले स्वार
वरुड तालुक्यातील गाडेगाव येथील रहिवासी रवी मटरे या व्यक्तीच्या दशक्रियाविधी आटोपून त्यांचे नातेवाईक झुंज गावातून वाहणाऱ्या वर्धा नदीत रक्षा विसर्जनासाठी आले होते. रक्षा विसर्जन केल्यानंतर त्यांचे नातेवाईक नारायण माटरे, किरण खंडारे, अश्विनी खंडारे, वृषाली वाघमारे, अतुल वाघमारे, निशा माटरे, आदिती खंडारे, मोहिनी खंडारे, पियुष माटरे, पुनम शिवणकर आणि दोन वर्षांची चिमुकली वंशिका शिवणकर हे सर्वजण नदीकाठीच्या बोटीतून नौका विहार करण्यासाठी बोटीत स्वार झाले. अकरा जणांसोबत नदी काठचे आणखी दोघे या बोटीत स्वार झाले. चार जणांची क्षमता असणाऱ्या बोटीत तेरा जण स्वार झाले होते. नदीला पूर असल्याने नदीत असणाऱ्या डोहात बोट हुलावकण्या घेऊ लागली. त्यावेळी नदी काठच्या त्या दोघांनी बोटीतून उडी मारली आणि पोहत बाहेर निघाले. मात्र, इतर अकरा जण नदीत बुडाले.