अमरावती:विदर्भातील शेतकऱ्यांसाठी मानाची ठरणारा असा क्षण आला आहे. अमरावती येथील शेतकरी रवींद्र मेटकर यांना
12 डिसेंबर 2022 ते 12 मे 2023 या काळात प्रशिक्षण घेत असलेल्या 185 आयएएस अधिकाऱ्यांना 7 मार्च रोजी मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली आहे. प्रगतशील शेतकऱ्यांकडून शिकवण या कार्यक्रमांतर्गत रवींद्र मेटकर यांना उत्तराखंडच्या मसूरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकॅडमीच्या वतीने त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. रवींद्र मेटकर यांना मिळालेली ही संधी विदर्भासाठी अभिमानास्पद ठरणारी बाब आहे.
रवींद्र मेटकर यांचा परिचय: विदर्भातील सर्वात अत्याधुनिक पोल्ट्री फार्मचे संचालक अशी रवींद्र मेटकर यांची ओळख आहे. रवींद्र मिटकरी यांनी 1984 मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी अमरावती शहरातील न्यू प्रभात कॉलनी येथील आपल्या घराच्या छतावर कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला होता. त्यावेळी एकूण शंभर कोंबड्या त्यांच्याकडे होत्या. आपल्या व्यवसायात सातत्य ठेवून हा व्यवसाय त्यांनी हळूहळू वाढवला आणि पुढे आपल्या शेतात पोल्ट्री फार्मला सुरूवात केली.
अत्याधुनिक पोल्ट्री फार्म: अमरावती जिल्ह्यात अंजनगाव बारी येथे त्यांचा मातोश्री पोल्ट्री फार्म आहे. 37 वर्षापासून कुक्कुटपालनाच्या व्यवसायाद्वारे त्यांच्याकडे आज तीस हजार 500 कोंबड्या असून ते दिवसाला एक लाख वीस हजार अंड्यांचे उत्पादन घेतात. मेटकर यांचा अत्याधुनिक पोल्ट्री फार्म हा स्वयंचलित असणाऱ्या उपकरणांनी सज्ज आहे. तीस हजार पाचशे कोंबड्यांना केवळ एक बटन दाबल्यावर मशीनद्वारे खाद्य पुरविले जाते. तसेच कोंबड्यांची विश्टा देखील स्वयंचलित यंत्रणेद्वारे अत्याधुनिक शेड मधून बाहेर काढली जाते .कोंबड्यांनी दिलेली अंडी सुद्धा स्वयंचलित पद्धतीने एका ठिकाणी जमा होतात या केंद्रात केवळ दोन महिलांच्या साह्याने एका ठिकाणी जमा होणारे सर्व अंडे ट्रेमध्ये भरल्या जातात. कोंबड्यांच्या शेडमध्ये योग्य तापमान राखण्यासाठी वातानुकूलित यंत्रणेची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
परराज्यात अंडींची विक्री: स्वच्छ वातावरणात या पोल्ट्री फॉर्ममध्ये सर्व कोंबड्यांचे आरोग्य उत्तम राहते. यामुळेच या कोंबड्यांची अंडी देण्याची क्षमता देखील तीन ते चार टक्के अधिक आहे. मेटकर यांच्या मातोश्री पोल्ट्री फार्म मधील अंड्यांची विक्री करण्यासाठी कुठेही बाहेर जावे लागत नाही. सर्व अंडीही पोल्ट्री फार्म मधुनच विकली जातात. मध्य प्रदेशातील भोपाळ, खंडवा, बऱ्हाणपूर ,इंदोर तसेच झांसी या शहरांमध्ये मेटकर यांच्या पोल्ट्री फार्मची अंडी जातात. यासह गुजरातच्या सुरत शहरात देखील मातोश्री पोल्ट्री फार्मची अंडी नियमित जाते.