महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Social Media Influencer : वऱ्हाडी भाषेच्या जोरावर विदर्भाच्या श्रुती आणि अनिकेतची समाज माध्यमांवर धमाल, वाचा 'हा' खास रिपोर्ट - सामाजिक विषयांवर हास्य विनोदी व्हिडिओ

विदर्भातील श्रुती आणि अनिकेतने 'आलू वांग्याची भाजी अन गपगप शिरा र...' या वऱ्हाडी भाषेतील गाण्याला संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळवून दिली. यासह वऱ्हाडी भाषेतील संवादाद्वारे अनेक शॉर्ट फिल्म्स, रिल्सद्वारे अमरावतीची श्रुती आणि अनिकेत हे दोघे सलग तीन वर्षांपासून समाज माध्यमांवर धमाल करीत आहेत. त्यांची ही धमाल आज संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाली आहे. नवरा बायकोच्या भांडणावरील त्यांच्या अभिनयाने त्यांच्या चाहत्यांना अक्षरशः वेड लावले आहे. सविस्तर जाणून घेण्यासाठी हा खास रिपोर्ट वाचा.

Vidarbha Social Media influencer
श्रुती आणि अनिकेतची समाज माध्यमांवर धमाल

By

Published : Jan 25, 2023, 9:25 AM IST

श्रुती आणि अनिकेतची समाज माध्यमांवर धमाल

अमरावती :नाटक आणि अभिनयाची आवड असणारा अनिकेत देशमुख हा नऊ वर्षापासून अमरावती बाहेर आहे. वाणिज्य शाखेची पदवी मिळाल्यावर त्याने मुंबईत एमबीए केले. काही वर्ष मुंबईत नोकरी केल्यावर तो पुण्यातील एका कंपनीत नोकरीवर लागला. सारे काही सुरळीत असताना लॉकडाऊनमुळे चक्क वर्षभर वर्क फ्रॉम होम या नव्या संकल्पनेमुळे अनिकेत अमरावतीत आपल्या घरी आला. यानंतर सोशल मिडियाच्या माध्यमातून त्याच्यातील असणारा अभिनय, कलाकार बाहेर यायला लागला.

सोशल मीडियावर धूम : खास वऱ्हाडी भाषेत वायएफपी या चैनलद्वारे त्याने एक दोन मिनिटाचे मजेदार व्हिडिओ तयार केले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर येताच अनिकेतच्या वऱ्हाडी शैलीतील अभिनयाला शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. या व्हिडिओला दोन लाख पाच लाख पंधरा लाख असे व्ह्युवर्स मिळाले. अनिकेत सोशल मीडियावर धूम करायला लागला. त्यांच्या टीमला आणखी काही हास्य विनोदी व्हिडिओसाठी नायिका हवी होती. नायिकेचा शोध सुरू झाला. त्यांची पत्रकारिता क्षेत्रात काम करणारी श्रुती गावंडे या तरुणीशी भेट झाली. यानंतर अनिकेत आणि श्रुतीच्या जोडीने सोशल मीडियावर अक्षरशः धमाल करण्यास सुरुवात झाली.

विदर्भाची श्रुती म्हणून ओळख :अस्सल वऱ्हाडी भाषेत संवादाची फेक करीत एखाद्या मुरलेल्या कलावंताप्रमाणे श्रुतीचा अभिनय शेतकऱ्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. अनेक शॉर्ट फिल्म, रिल्सद्वारे श्रुतीने प्रत्येकाच्या मोबाईलवर ताबा मिळवला. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत श्रुतीच्या अभिनयाची प्रशंसा व्हायला लागली. ग्रामीण भागात घरोघरी चहा पिण्यासाठी आलेले बोलावणे आणि यावर श्रुतीची प्रतिक्रिया हे सारे काही प्रचंड आवडले आहे. विदर्भाची श्रुती म्हणून तिच्या इंस्टाग्रामवरील पेजला दोन लाखाच्या वर फॉलोवर्स आहेत. श्रुतीच्या व्‍लॉग्सला देखील भरपूर पसंती मिळत आहे.

छंद, धमाल आणि पैसा :युट्युब, फेसबुक, इंस्टाग्राम, व्‍लॉग यावर श्रुती आणि अनिकेत आपल्या कलागुणांचा छंद जोपासित धमाल करीत असतानाच त्यांना याद्वारे पैसेही मिळतात. लॉकडाऊनच्या काळात सुरुवातीला 50 ते 60 हजार रुपये महिना इतकी रक्कम आम्हाला मिळाली. कधी तर महिन्याला पाच हजार रुपये देखील आम्हाला मिळाल्याचे अनिकेत आणि श्रुती 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले. आम्हाला समाज माध्यमांवरील व्हिडिओद्वारे जे काही पैसे मिळतात, त्यातून आमच्या टीममध्ये असणाऱ्या सर्वांनाच त्यांचा मोबदला दिला जातो. आम्ही आता सोशल मीडियावर फेमस झाल्यामुळे अनेक कार्यक्रमात मला खास आकर्षण म्हणून बोलाविले जाते. यासाठी तीस हजारपर्यंत मानधन मला मिळते. जे जवळचे आहेत, त्यांच्याकडून त्यांनी जे दिले ते आम्ही स्वीकारतो असे श्रुती म्हणाली. येणाऱ्या काळात 'सातबारा' ह्या आमच्या नव्या यूट्यूब चॅनलद्वारे प्रचंड धमाल आणि मनोरंजन शेतकऱ्यांचे होणार असल्याचे श्रुती आणि अनिकेत म्हणाले.

स्क्रीनवरच्या जोडीला लग्नाची गोडी :केवळ वऱ्हाडी भाषा शैलीत विविध सामाजिक विषयांवर हास्य विनोदी व्हिडिओ तयार करण्यासाठी लॉकडाऊनमध्ये एकत्र आलेले अनिकेत आणि श्रुती यांच्यात छान मैत्री निर्माण झाली. दोघांचीही जोडी ही नवरा बायकोप्रमाणेच भासायला लागली. मी कोणत्या कार्यक्रमात गेले, तर हे आले नाहीत का सोबत म्हणून अनेकजण विचारायचे. त्यावेळी माझे लग्न झाले नाही, असे मला सांगावे लागायचे. आमच्यात केवळ मैत्रीचे नाते होते, असे श्रुती म्हणाली. माझ्या घरी माझ्या लग्नाचा विषय सुरू झाला. श्रुतीकडे तिच्यासाठी मुलगा पाहणे सुरू झाले. लग्नानंतर श्रुतीचा अभिनय कायमचा बंद होणार हे निश्चित होते.

लग्नाला मान्यता :श्रुतीमधील अभिनयाचे कलागुण असे वाया जाऊ नये या उद्देशाने मीच तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तिने होकार दिल्यावर तिच्या घरच्यांनीही आमच्या लग्नाला मान्यता दिली असे अनिकेत म्हणाला. जानेवारी महिन्याच्या अखेरीस अनिकेत आणि श्रुती लग्न करणार आहे. स्क्रीनवर झळकणारी ही जोडी लग्नानंतर 'सातबारा' ह्या त्यांच्या नव्या युट्युब चॅनेलवर प्रचंड धमाल करणार आहे. सर्वांनी यासाठी तयार राहा, असे अनिकेत आणि श्रुती 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले.

हेही वाचा :Youngest Reach Jivdhan fort in Nauvari Saree : आठ वर्षाच्या चिमुकलीने नऊवारी साडी नेसून पार केला जीवधन सुळका, वाचा हा खास रिपोर्ट

ABOUT THE AUTHOR

...view details