महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Vermicompost Production : मेळघाटातील मोथा गावात गांडूळ खत निर्मिती; महिलांना मिळाला आर्थिक संपन्न होण्याचा मार्ग - पाणी फाऊंडेशन मेळघाट

गांडूळ खत तयार करून एका बचत गटाने मेळघाटात एक नवीन उपक्रम राबवला आहे. तीन जणींचा मिळून हा महिला बचत गट चालवला जात आहे. या उपक्रमामुळे उत्कृष्ट दर्जाचे गांडूळ खत तयार होत आहे. यामुळे आर्थिक मदत देखील होत आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Jun 25, 2023, 3:58 PM IST

Updated : Jun 25, 2023, 4:14 PM IST

मेळघाटात गांडूळ खत निर्मिती

अमरावती - दुधाचे भरपूर उत्पन्न असणाऱ्या आणि खव्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मेळघाटातील मोथा या गावात गांडूळ खत तयार करून तीन जणींचा समावेश असणाऱ्या प्राची महिला बचत गटाने कधी नव्हे तो पहिल्यांदाच नवा उपक्रम मेळघाटात राबविला आहे. विशेष म्हणजे अतिशय उत्कृष्ट दर्जाचे गांडूळ खत या ठिकाणी तयार होत असून गांडूळ खत निर्मितीच्या माध्यमातून या तिन्ही महिलांची आर्थिक संपन्नतेकडे सुरू असणारी वाटचाल ही त्यांच्या कुटुंबासाठी आणि संपूर्ण मोथा गावासाठी अभिमानाची बाब आहे.

असा सुरू झाला गांडूळ खत निर्मिती प्रकल्प- मेळघाटातील आदिवासी आणि गवळी समाजाचा शेतीद्वारे विकास व्हावा तसेच शेतीशी संबंधित उद्योगांद्वारे त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा या उदात्त हेतूने पाणी फाउंडेशनद्वारे चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या मोथा या गावात प्राची महिला बचत गटाच्या माध्यमातून खास गांडूळ खत निर्मिती प्रकल्प साकारण्यात आला. पाणी इकोच्या माध्यमातून प्राची महिला बचत गटाला गावातील उंच भागावर मोठे शेड उभारण्यात आले. या शेडमध्ये एकूण पाच बेडमध्ये गांडूळ खत तयार करण्यासाठी आर्थिक सहाय्य देखील करण्यात आले. प्राची बचत गटात असणाऱ्या सविता भाकरे, नर्मदा येवले आणि नर्मदा निखाडे या तीन महिलांनी हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केलेत. त्यांच्या या प्रयत्नाला ग्रामस्थांनी देखील साथ दिली. मोथा या गावात पशुधन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या गांडूळ खत प्रकल्पाला शेणखत मोठ्या प्रमाणात अगदी सहज उपलब्ध झाले. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी ग्रामपंचायत द्वारे पाण्याचा पुरवठा देखील करण्यात आला आहे.

लवकरच होऊ यशस्वी - आम्ही कधीही गांडूळ खत पाहिले नव्हते. मात्र, आमच्या गावात पाणी फाउंडेशनचे लोक आले आणि त्यांनी आम्हाला या प्रकल्पाबाबत सर्वात आधी माहिती दिली. आम्हाला हा प्रकल्प सुरू करण्यासाठी संपूर्ण मदत देखील केली. या प्रकल्पाच्या माध्यमातून आता रोजगार उपलब्ध झाला असल्याचे प्राची महिला बचत गटाच्या अध्यक्षा सविता भाकरे यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे. या प्रकल्पासाठी लागणारे शिदोडे आम्हाला पाणी फाउंडेशनने दिले. गांडूळ खत कसे तयार करायचे याबाबत त्यांनी आम्हाला मार्गदर्शन देखील केले. आम्ही आमच्याच गावातून शेणखत खरेदी केले आणि या पाच बेडमध्ये भरले. यामध्ये आम्ही नियमित पाणी टाकले. या प्रकल्पाद्वारे आम्हाला आमची रोजची मजुरी मिळत आहे.

गांडूळ खत निर्मिती

दोन वर्षांपासून आम्ही हा प्रकल्प राबवत आहोत. शेतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे गांडूळ खत केवळ नऊ रुपये किलो या दराने आम्ही विकतो. अतिशय उत्कृष्ट प्रतीचे असणाऱ्या आमच्या गांडूळ खताला मागणी आणि थोडी अधिक किंमत मिळाली तर गांडूळ खताचा मेळघाटातील हा पहिला प्रकल्प यशस्वी भरारी घेऊ शकतो - सविता भाकरे

वर्षाला लाख रुपये उत्पन्न - मोथा या गावात मोठ्या संख्येत पशुधन असल्यामुळे याठिकाणी शेणखत मुबलक आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. ही या प्रकल्पासाठी जमेची बाजू असल्याचे पाणी फाउंडेशनचे चिखलदरा तालुका समन्वयक वैभव नायसे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. या प्रकल्पात असणाऱ्या पाच बेडमध्ये एकूण तीन ट्रॉली शेणखत लागते. अडीच हजार रुपये ट्रॉली प्रमाणे या शेणखताला सात हजार रुपये खर्च येतो. या शेणखतापासून 5 हजार किलो गांडूळ खत तयार होते. आठ रुपयाच्या भावाप्रमाणे एकूण 28 ते 30 हजार रुपयेपर्यंत एका टप्प्यात बचत गटाच्या तिन्ही महिलांना नफा मिळतो. वर्षभरात एक लाख रुपयापर्यंत उत्पन्न या प्रकल्पाद्वारे तिन्ही महिलांना मिळत असल्याचे वैभव नायसे यांनी सांगितले.

अडीच हजार रुपये ट्रॉली प्रमाणे या शेणखताला सात हजार रुपये खर्च येतो. या शेणखतापासून 5 हजार किलो गांडूळ खत तयार होते. आठ रुपयाच्या भावाप्रमाणे एकूण 28 ते 30 हजार रुपयेपर्यंत एका टप्प्यात बचत गटाच्या तिन्ही महिलांना नफा मिळतो - पाणी फाउंडेशनचे चिखलदरा तालुका समन्वयक वैभव नायसे

दर्जेदार खत शेती आणि नर्सरीसाठी उपयुक्त -आज शहरी भागात गांडूळ खत हे 30 ते 40 रुपये किलो दराने विकले जाते. मेळघाटातील मोथा येथील गांडूळ खत हे शहरात उपलब्ध असणाऱ्या गांडूळ खतापेक्षा कैकपटीने उच्च दर्जाचे आहे. या प्रकल्पातील गांडूळ खताला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी पाणी फाउंडेशनच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. शेतातील विविध पीक आणि नर्सरीमध्ये लावल्या जाणाऱ्या विविध फळाफुलांच्या झाडांसाठी अतिशय पौष्टिक असे गांडूळ खत मोथा या गावातून सर्वत्र गेले तर या बचत गटाला आर्थिक लाभ होईल आणि घेणाऱ्यांना त्यापेक्षा अधिक समाधान आणि फायद्याचे ठरेल, असे वैभव नायसे यांच्यासह सविता भाकरे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -

  1. Melghat Bird Survey: मेळघाटात पहिल्या पक्षी सर्वेक्षणात नव्याने १० प्रजातींची भर; २१० प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद
  2. Melghat Malnutrition : अखेर 'त्या' मातेने अंधश्रद्धेला फाटा देत पोटच्या गोळ्याला दिले जीवनदान
Last Updated : Jun 25, 2023, 4:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details