अमरावती - राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असल्याचा अंदाज तज्ञांच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून अधिकाअधिक लसीकरण यांवर भर दिला जातोय .मेळघाटमध्येसुद्धा आदिवासी बांधवांच्या शंभर टक्के लसीकरणासाठी आरोग्य विभाग व प्रशासन सक्रिय झाले आहे .मेळघाटामध्ये विविध अफवा, भीती आणि अंधश्रद्धा यामुळे आदिवासी बांधव लसीकरणासाठी पाठ फिरवतात. परंतु आता स्थानिक प्रशासनाने रोजगार हमीतील मजुरांच्या लसीकरणासाठी शेताच्या बांधावर कोरोना प्रतिबंधक लसीकरण कॅम्प उभारल्याने लसीकरणालचा जोर वाढला आहे.
मेळघाटात रोहयो मजुरांचे लसीकरण; थेट शेतांच्या बांधावर उभारले लसीकरण कॅम्प - Melghat Vaccination news
धारणी चिखलदरा तालुक्यात विविध ठिकाणी आता शेताच्या बांधांवर लसीकरण कॅम्प उभारले आहेत. येथे दररोज शेकडो रोजगार हमी योजनेतील आदिवासी मजुरांचे लसीकरण, कोरोनाबाबतची जनजागृती, तसेच लसीकरणाविषयी मनात असलेले गैरसमज दूर केले जात आहे.
कॅम्प उभारत लसीकरण
मेळघाट राज्यातील आदिवासी दुर्गम भाग आहे. येथील आदिवासी बांधव मध्ये शिक्षणाचा अभाव आहे.त्यामुळे येथिल अनेक आदिवासी डॉक्टर ऐवजी बुवाबाजीला प्राधान्य देतात. त्यामुळेच कोरोनाची लस घेतल्याने मूलबाळ होत नाही. लसीमुळे मृत्यू होतो. अशा विविध अफवा या मेळघाटमध्ये पसरल्या गेल्या आहे. त्यामुळे येथील आदिवासी बांधव अनेकदा लसीकरणाकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे आता स्थानिक प्रशासनाने थेट रोजगार हमीच्या कामावर जाऊन तेथील लोकांना समुपदेशन करून कोरोना लस घेणे का गरजेचे आहे हे सांगून एका ठिकाणी कॅम्प उभारण्यात आला आणि तिथे त्यांचं लसीकरण केले जात आहे.
आदिवासी बांधवांच्या दारी जाऊन लसीकरण
मेळघाटमध्ये वाहतुकीची फार व्यवस्था नाही त्यामुळे प्रशासनाच्या लसीकरण केंद्रांवर आदिवासी बांधव पोहोचू शकत नाही. म्हणून आता प्रशासनच थेट आदिवासी बांधवांच्या दारी जाऊन त्यांच्यासाठी कोरोणा प्रतिबंधक लसीकरणाचे कॅम्प उभारत आहे.आदिवासी बांधवांचे गैरसमज दूर करण्यासाठी मेळघाटातील गावातील सरपंच सुरुवातीला लस घेऊन लसीकरण या बद्दल चे महत्त्व आणि लसीकरणापासून कुठलेही नुकसान होत नाही तर त्याचा फायदा होतो हे आदिवासी बांधवांना सांगत आहे .त्यामध्ये माध्यमातून आदिवासींना धीर देऊन त्यांनाही लसीकरण करण्यास भाग पाडत आहे..
"कोरोना हारतीवा मेळघाट जितोवा" सीरिअल सुरू.
मार्चमध्ये लसीकरण सुरू केले तेव्हा लोकांमध्ये मोठे गैरसमज होते. ते दूर करण्यासाठी प्रकल्प अधिकारी डॉ मिताली सेठी यांनी कोरकू भाषेत "कोरोना हारतीवा मेळघाट जितोवा" ही सीरिअल सुरू केली होती. या सीरिअलचा मोठा फायदा झाला असून त्यानंतर लोकांमधील गैरसमज हळू हळू दूर होऊ लागले आहेत.
गावोगावी सरपंच यांच्या बैठका
मेळघाटात लसीकरण मोहिम वाढविण्यासाठी व अदिवासी मधील गैरसमज दूर करण्यासाठी गावागावातील सरपंच त्यांच्या बैठका घेण्यात आल्या. गावचे प्रमुख सरपंच असल्याने त्यांना मानणारे आदिवासी लोक असतात. त्यामुळे आधी गावातील सरपंच व सदस्य यांना डॉ मिताली सेठी यांनी लसीकरण घ्यायला लावले. याला लोकांचा प्रतिसाद मिळाला आहे. सोबतच रोजगार हमी योजनेच्या कामावर देखील लसीकरण कॅम्प लावण्यात आले. तेथे सरपंच यांच्यावतीने जनजागृती करण्यात आली.
मेळघाटात अशी आहे लसीकरणाची परिस्थिती
अमरावतीच्या मेळघाटमध्ये चिखलदरा आणि धारणी या दोन तालुक्याच्या समावेश आहे. यामध्ये चिखलदरा तालुक्यात साडेसहा हजार लोकांचे लसीकरण तर धारणी तालुक्यात आठ हजारापर्यंत लोकांचे लसीकरण झाले आहेत. त्यामुळे 45 वर्षवरील लोकांचे 23 टक्के हे लसीकरण संपूर्ण मेळघाटात झाले आहे. मेळघाटमध्ये जवळपास 350 गावे आहे. त्यामुळे दरोरोज तीन ते चार कॅम्प लावण्याचे आदेश देण्यात आले आहे.
मेळघाटातील चार गावांमध्ये 100% लसीकरण
एकीकडे मेळघाटमध्ये अनेक गावात लसीकरण संदर्भात लोकांमध्ये गैरसमज आहेत. मात्र, तरीही याच मेळघाटामध्ये मात्र, चार गावातील 45 वर्षावरील नागरिकांचे 100% लसीकरण केले आहे. यामध्ये चिखलदारा तालुक्यातील टेम्बुरसुना आणि चिंचखेड या गावातील नागरिकांचे 100% लसीकरण झालेले आहे .त्याच पार्श्वभूमीवर चिचखेड येथील सरपंच यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधून त्यांचे कौतुकही केले होते.